पूरग्रस्त, शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही : राजू शेट्टी

  जयसिंगपूर : गेल्या महिन्यात कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला. महिना उलटून गेला तरी पुरग्रस्तांना, स्थलांतरितांना सानुग्रह अनुदान मिळत नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊनही अगदी नगण्य घोषणा झाल्या आहेत. सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.त्यासाठी सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांचे पत्र मिळाल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी जाहीर केले. ‘आक्रोश पुरग्रस्तांचा परिक्रमा पंचगंगेची’ या जलसमाधी आंदोलनावेळी नृसिंहवाडी येथे बोलत होते.

  महापुरामुळे शेतकरी, कष्टकरी त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. गेले दीड वर्ष कोरोनामध्ये गेले आहे. लागोपाठ आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांबरोबर शेतमजूर, छोटे व्यापारी यांना अतोनात हाल सोसावे लागले आहेत. विद्यार्थ्यांना 50 टक्के फी जमा करा अशा अटी संस्था करत असतील तर पोरांना शिकवायचं कसं असा उद्विग्न सवालही शेट्टी यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीत योग्य निर्णय झाला नाही. तर राज्यातील मंत्र्यांना फिरू देणार नाही त्यांच्या गाड्या अडवून रास्ता रोको करण्यात येईल असा इशाराही शेट्टी यांनी दिला. 1 सप्टेंबरपासून सुरू असलेले प्रयाग चिखली ते नृसिंहवाडी जलसमाधी आंदोलन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणामुळे स्थगित करण्यात आले.

  सोमवारी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी निमंत्रण दिल्याने भेटीत पुरग्रस्त, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकरी शेतकऱ्यांचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत सुटणार आहे.

  कार्यकर्त्याची पुलावरून उडी

  कुरुंदवाड येथील दिनकरराव यादव पुलावरून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी उडी घेतली जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्यासमोरच घेतलेले पोलिसांची तारांबळ उडाली.

  पदयात्रेचे सभेत रूपांतर

  रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही पदयात्रा आली परंतु तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांचे पत्र मिळाल्याचे प्रशासनाने सांगितल्यानंतर तिथेच सभा सुरू करण्यात आली. या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला परंतु राजू शेट्टी यांनी आपण सोमवारी मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिलेल्या पत्रानुसार भेटायला जाणार असल्याचे जाहीर केले.

  मोठा पोलीस बंदोबस्त

  कुरुंदवाड व नृसिंहवाडी येथे शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच राखीव पोलीस दलाचे जवान असे सुमारे सातशे जण तैनात करण्यात आले होते. तर 10 यांत्रिक बोटी, पाच रेस्क्यू फोर्स ची पथके यांना पाचारण करण्यात आले होते.