कोल्हापूर महापालिकेला २०३ कोटी रूपयांचा निधी मंजूर

    कोल्हापूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजना नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या विकास प्रकल्पासाठी दोन टप्प्यात २०३. ८२ कोटी रूपयांच्या निधीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिली. हा निधी मंजूर करण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

    कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या विकास प्रकल्पाबाबत मंत्रालयात एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, नियोजन मंडळाचे उपस्थितीत बैठक पार पडली. महापुरामुळे कोल्हापूर शहरातील रस्ते खराब झाले असून, रस्ते विकास प्रकल्पासाठीच्या निधीला मंजूरी द्यावी, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली होती.

    कोल्हापूरातील रस्त्याचे प्रकल्प अपूर्ण आहेत. त्यामुळे निधी कसा द्यायचा असा प्रश्न नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक यांनी उपस्थित केला. यावेळी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून त्याची पूर्तता महानगरपालिका एक महिन्यात करेल, अशी ग्वाही आमदार जाधव यांनी दिली. महापालिका आवश्यक त्या सर्व कागदांची पूर्तता करेल, असे प्रशासक डॉ. कादबंरी बलकवडे यांनी सांगितले.

    पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोरोना स्थितीमुळे रस्ते विकास प्रकल्पासाठी महानगरपालिकेचा हिस्सा २५ वरुन १० टक्के करा, अशी मागणी केली .