बोले तो गांधीगिरी जिंदाबाद ! पंचगंगेच्या ढासळलेल्या बुरुजात झोपून कोल्हापूरवासियांचे अनोखे आंदोलन

विशेष म्हणजे कोल्हापूरवासियांनी आमदार, खासदार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार नसल्याचं होर्डिंग त्यांनी हाती धरत गांधीगिरी केली.

    कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून पंचगंगा घाटावरील बुरुज कोसळला आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत कोल्हपूरकरांनी आक्रमक होत अनोखे आंदोलन केले. कोल्हापूरकरची जीवनदायिनी असलेली पंचगंगा मरणासन्न अवस्थेत असल्याने कोल्हापूर रहिवास्यांनी पंचगंगा घाटावरील पडलेल्या बुरुजात झोपून आंदोलन केले. विशेष म्हणजे कोल्हापूरवासियांनी आमदार, खासदार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार नसल्याचं होर्डिंग त्यांनी हाती धरत गांधीगिरी केली.

    अनोखे होर्डिंग !

    “आम्ही कोल्हापूरकर आजपासून मंत्री, आमदार, खासदार, शहर लोकप्रतिनिधी, नेते, महापालिका, जिल्हा प्रशासन अधिकारी, विविध विकास समिती पदाधिकारी यांना यापुढे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार नाही. कारण त्यांच्या दुर्लक्षामुळे आमची पंचगंगा मरणासन्न आहे” असे होर्डिंग धरुन कोल्हापूरवासियांनी आंदोलन केलं.

    कोल्हापूर हे पंचगंगा नदीच्या किनारी वसलेले शहर असून तिचा उगम पश्चिम घाटामध्ये होतो. या नदीला भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी आणि धामणी अशा पाच उपनद्या असून त्या शहर आणि आसपासच्या परिसरातून वाहतात. कोल्हापुरात पूर्वी फिरंगाई , वरुणतीर्थ, लक्षतीर्थ, कपिलतीर्थ, कुंभारतळे, महारतळे, पद्माळे, सिद्धाळा, रंकाळा, कोटीतीर्थ, रावणेश्वर तलाव अशी तळी होती. पण जसजसे शहर वाढू लागले तसे ती तळी बुजवून तिथे नागरी वस्ती झाली.