सर्वसामान्य रुग्णांचा आधारवड ‘घुणके हॉस्पिटल’

  कोल्हापूर : चंदेरी नगरी हुपरी शहर म्हणजे…संपूर्ण देशात चांदीचे दागिने बनवण्यासाठी प्रसिद्ध…याच शहरात अनेक हॉस्पिटल आहेत. परंतु सुमारे १३ वर्षापूर्वी डॉ. सयाजी घुणके व डॉ. प्राची घुणके या दांपत्याने स्त्री रोग तज्ञ म्हणून आपली वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अल्पावधीतच नोव्हेंबर २०१३ रोजी यशवंत नगर भागात सर्व सोयीनियुक्त असे ‘घुणके हॉस्पिटल’ चे इवलेसे रोपडे लावले. या दांपत्याने गरीब रुग्णांच्या अडीअडचणी व बाळंतपण तसेच अनेक गंभीर समस्येवर गरीब रुग्णांची कोल्हापूर, इचलकरंजी सारख्या मोठ्या शहरात होणारी धावपळ रोखण्यासाठी हुपरी सारख्या ग्रामीण भागात सुसज्ज असे हॉस्पिटल सुरू केले.

  सुरुवातीपासून डॉ. दांपत्याचा दिलदार स्वभाव व हसतमुख व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी अनेक रुग्णांना आपलेसे केले. या हॉस्पिटलमध्ये स्त्रिया संबंधित सर्व रोगांवर उपचार करण्यास सुरुवात केली. डॉ.घुणके दांपत्य हे सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने सर्वसामान्य रुग्णांना आधार देण्याचे काम केले. हुपरी व हुपरी परिसरात ‘घुणके हॉस्पिटल’ नाव अतिशय विश्वासाने व आदराने घेतले जाते. आजपर्यंत हजारो प्रसूती, सिझेरियन प्रसूती, स्त्रियांशी संबधित इतर शस्त्रक्रिया सुखरूप पार पाडण्याचे महत्वपूर्ण काम या डॉ. घुणके दांपत्याने केले.

  सुरुवातीपासून अजातशत्रू असलेल्या या दांपत्याने वैद्यकीय सेवेत कौतुकास्पद काम करत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्लब असलेल्या घटकांसाठी हॉस्पिटलमध्ये अतिशय अल्प व सवलतीच्या दरात रुग्णांना सेवा देण्याचे काम चालू केले, ते आजतागायत सुरु आहे.

  साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी आलेल्या ऊसतोड मजूरांना सवलतीच्या दरात सेवा दिली आहे. त्यामध्ये एका ऊसतोड मजूर महिलेला गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात अंडाशयात मोठी गाठ फुटून गंभीर अवस्था निर्माण झाली होती. तिच्यावर अचूक निदान करुन अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया तातडीने विनामोबदला करण्याचे महत्वपूर्ण काम या डॉक्टर दांपत्याने केले.

  वैद्यकीय सेवेबरोबर सन २०१९ साली आलेल्या महापूराने कोल्हापूर जिल्हासह परिसरातील जिल्ह्यात मोठा हाहाकार माजला होता. त्यावेळी शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील नदीकाठावरील गावात असलेल्या पूरग्रस्त छावणीत विनामोबदला सेवेबरोबर तपासण्या, औषधोपचार देण्याचे काम डॉ. सयाजी घुणके यांनी केले. तसेच ऑगस्ट २०१९ मधील एका आठवड्याचे हॉस्पिटलचे जमा होणारे पैशातून १०० जीवनावश्यक वस्तूंचे किट पूरग्रस्तांना दिले.

  यासह कोरोना महामारीत एकही दिवस हॉस्पिटल न बंद ठेवता सर्वसामान्य महिला रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार देण्यासाठी दांपत्याने परिश्रम घेतले आहे. आजच्या काळात पैशांपेक्षा रुग्णांचे आशिर्वाद मोठे असा आशावाद मानून कार्यरत असलेल्या या डॉ. सयाजी घुणके व डॉ. प्राची घुणके यांच्या कार्याला मानाचा सलाम…