गोकुळने नेहमीच गुणवत्‍तेला महत्‍त्व दिलंय : विश्वास पाटील

    कोल्‍हापूर : गोकुळने नेहमीच गुणवत्‍तेला महत्‍व दिले आहे. म्‍हणूनच बाजारात गोकुळच्‍या दूध व दुग्‍धजन्‍य पदार्थांना अधिक मागणी आहे. तर उत्पादन वाढीसाठी नेहमीच संचालक मंडळ प्रयत्नशील राहणार आहे, असे गोकुळ संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी गोकुळच्या कामकाज आढावा बैठकीत सांगितले.

    संघाचे महालक्ष्‍मी पशुखाद्य उत्‍पादित केले जाते. त्‍याबरोबर जनावरांना त्‍यांच्‍या शरीर पोषणाबरोबर दूध वाढीसाठी कारखान्‍यामध्‍ये टी.एम.आर. ब्‍लॉक, फर्टीमिन प्‍लस, सिल्‍वर रेशन पॅलेट व लहान वासरांसाठी मिल्‍क रिप्‍लेसर, काफ स्‍टार्टर व फिडींग पॅकेज उत्‍पादित केले जाते. या सर्व उत्‍पादनांची गुणवत्‍ता राखण्‍यासाठी संघाने ISO बरोबर BIS स्‍टँडर्डसाठी नोंदणी केली असून, यापुढे चांगल्‍या गुणवत्‍तेचे पशुखाद्य गोकुळच्‍या दूध उत्‍पादकांना त्‍यांच्‍या गाई व म्‍हैशींसाठी उपलब्‍ध केले जाईल. गोकुळ मुंबई, पुणे, तसेच महाराष्‍ट्रातील इतर बाजारपेठेत म्‍हैस दूधासाठी प्रसिध्‍द आहे.

    भविष्‍यात जास्‍तीत जास्‍त म्‍हैशीच्‍या दूध उत्‍पादनाचा टप्‍पा ओलांडण्‍यासाठी गोकुळच्‍या व्‍यवस्‍थापनाने विशेष खबरदारी घेतली पाहिजे. म्‍हैस दूध उत्‍पादन वाढीसाठी दूध उत्‍पादकांना विविध प्रकारच्‍या सेवा सुविधा देण्‍यावर भर दिला पाहिजे. गोकुळच्‍या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेले गोकुळचे विस्‍तार सुपरवायझर यांनी संकलन वाढीशिवाय वर्षभरात १,००० लिटरने दूधाची वाढ त्‍यांच्‍या नियंत्रणाखाली असणाऱ्या दूध संस्‍थेमधून झाली पाहिजे, असे उद्दिष्‍ट विस्‍तार सुपरवायझरना घालून दिले आहे. तसेच वीस लाख लिटर दूधाचे संकलन पूर्ण करण्‍यासाठी संघाच्‍या सर्व विभागामार्फत नियोजन करावे, अशा सूचना सबंधित विभागांना दिल्‍या आहेत.

    गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे व सर्व संचालकांनी दूध उत्‍पादन वाढीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन व सूचना केल्या. या वेळी संचालक अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड (बाळ), बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील (एस.आर.), प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके. संचालिका अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डी.व्‍ही. घाणेकर, तसेच अधिकारी उ‍पस्थित होते.