ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेसमोर सामुदायिक आत्मदहनाचा इशारा

जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ६ सप्टेंबरला जिल्हा परिषदेसमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

    कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ६ सप्टेंबरला जिल्हा परिषदेसमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र, प्रशासनानेही याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने या कर्मचाऱ्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.

    ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी, वसुलीची अट रद्द करण्यात यावी, यासह गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. अनेक वेळा मोर्चे आंदोलन आणि निवेदन देऊनही प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आज एकत्र येत ६ सप्टेंबरला जिल्हा परिषदेसमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

    दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच हजार शंभर ग्रामपंचायत कर्मचारी आहेत. हे सर्व कर्मचारी या आंदोलनात एक दिवस काम बंद ठेवून सहभागी होणार आहेत. याबाबत उद्या सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने निवेदन देखील देण्यात येणार आहे.