डॉ. सुधाकरराव कोरे यांना अभिवादन; पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध उपक्रम

    पेठवडगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले) महात्मा गांधी चॅरिटेबल मेडिकल ट्रस्टचे उपाध्यक्ष व तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. सुधाकरराव कोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या समाधीस्थळी वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे यांच्यासह मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले. पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. यावेळी धार्मिक विधी झाले.

    पुण्यस्मरण दिनानिमित्त तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाच्या वतीने मोफत दंत स्वच्छता शिबीर व वृक्षारोपण, दंत महाविद्यालयाच्या वतीने व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन व वृक्षारोपण आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते झाले. इतर रुग्णांच्या साठी एक महिना विनामूल्य दंत स्वच्छता व वारणा समूहातील कर्मचाऱ्यांसाठी तीन महिने विनामूल्य दंत स्वच्छता शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरामध्ये ७० जणांनी रक्तदान केले. डॉ. सुधाकरराव कोरे यांच्या जीवनावरील चित्रफित दाखवण्यात आली.

    यावेळी डॉ. शरदिनी कोरे, डॉ. शिल्पा कोठावळे, डॉ.शैलेश कोरे, वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे, डॉ. विजय कोरे, वारणा बँकेचे माजी अध्यक्ष प्रमोद कोरे, रूपाली कोरे, डॉ. कौशल कोठावळे, विश्वेश कोरे, वारणा दूध संघाचे संचालक प्रदीप देशमुख, शिवाजीराव जंगम, दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीश कुलकर्णी, दंत महाविद्यालयातील व महात्मा गांधी हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर, कर्मचारी, विद्यार्थी वारणा समूहातील पदाधिकारी संचालक व अधिकारी उपस्थित होते.