hasan mushrif

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांना ‘मी पुन्हा येईन’ ची स्वप्ने पुढील दहा वर्षे तरी पाहू नयेत,असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनी दिला आहे.

  कोल्हापूर: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांना ‘मी पुन्हा येईन’ ची स्वप्ने पुढील दहा वर्षे तरी पाहू नयेत,असा सल्ला दिला आहे.ते पुढील साडेतीन वर्ष नव्हे तर दहा वर्षात देखील महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करू शकणार नाहीत, असा टोला लगावला. महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने फडणवीस यांची गोव्यात जास्त आवश्यकता आहे.त्यांना गोव्याच्या टास्क फोर्सचा अध्यक्ष करण्यात यावे असेही मुश्रीफ म्हणाले.ते कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

  मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर राज्यात भाजपच्या नेत्यांना प्रत्युत्तर देण्यात अग्रेसर असणारे दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणजे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे नेहमी आघाडीवर असतात.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असल्याने मंत्री मुश्रीफ हे कोल्हापुरात असले काय किंवा मुंबईत असले काय भाजपा नेत्यांवर कडाडून हल्ला चढवतात.त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात.

  ग्रामविकास मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच गुजरातचा दौरा केला.परंतु त्यांनी कोकण आणि केरळचासुद्धा हवाई दौरा करणं अपेक्षित होते.पंतप्रधान हे केवळ गुजरातचे नाहीत ते संपूर्ण देशाचे आहेत. पण ते तसे वागताना दिसत नाहीत.

  भाजपा नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले

  दोन दिवसांपूर्वी चक्रीवादळात समुद्रात अडकलेल्या अनेकांचा बळी गेला.याबाबत संबंधित जहाज कंपन्यावर मनुष्यवधाचा खटला दाखल करावा, अशी मागणी मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. यावर भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी टीका करताना मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा आरोप केला होता.यावर बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले,अशी मागणी करताना भातखळकर यांना लाज वाटली पाहिजे.ते त्या कंपनीचे एजंट आहेत की वकील ? असा सवाल करून ते म्हणाले, भाजपची सत्ता गेल्यामुळे या पक्षाच्या अनेक नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.

  देशात शरद पवारांचा दरारा कायम

  देशात शरद पवारांचा अजूनही दरारा आहे. केंद्राने खताच्या दरात वाढ केली.ही दरवाढ मागे घ्या म्हणून पवार यांनी पत्र लिहिताच एका दिवसात दरवाढ मागे घेण्यात आली. यावरून पवारांचा दरारा लक्षात येतो,असे त्यांनी सांगितले, मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे यांचे समाधान होईल, असे प्रयत्न महाविकास आघाडी करेल,अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.मराठा आरक्षणाबाबत महाविकासआघाडी सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  रुग्ण दगावत असणाऱ्या खासगी दवाखान्याचे फेर ऑडिट करा

  खाजगी दवाखान्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे. काही दवाखान्यात पैसे मिळवण्यासाठी धडपड सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.वेळेत रुग्ण दाखल होऊनही ज्या दवाखान्यात रुग्ण दगावत आहेत अशा दवाखान्याची फेर ऑडिट करण्याची विनंती करणार असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.