कोल्हापुरात पावसाचा कहर; पंचगंगा ओलांडतीये धोक्याची पातळी

  कोल्हापूर : भारतीय हवामान खात्याने २२ ते २५ जुलै या काळासाठी कोल्हापूर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असून, आज दुपारी एक वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधार्‍याच्या ठिकाणची पाणी पातळी 38 फूट ४ इंच इतकी झाली आहे. पंचगंगा नदी लवकरच ३९ फूट ही इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.

  जिल्ह्यातील ८३ बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. सध्या सुरु असलेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे लोकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज आणि सध्या जिल्ह्यात होत असलेला पाऊस याचा विचार करुन जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने आवश्यक ती दक्षता घेतली आहे. गरज भासेल त्या ठिकाणी मदत कार्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर शहरातील आणि जिल्ह्यातील ओढे तसेच नदीकाठच्या लोकांनी पाणी पातळीत वाढ होऊ लागल्यानंतर तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन केले आहे.

  जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद

  शाहूवाडी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे रस्ते बंद झाले आहेत. जाधववाडी निळे या ठिकाणी पाणी आल्याने कोल्हापूर ते रत्नागिरी हायवे बंद झाला आहे. तसेच बरकी गावचे पुलावर पाणी आल्याने बरकी गावचा संपर्क तुटला आहे.

  – मालेवाडी ते सोंडोली जाणारे पुलावर पाणी आल्याने शिततुर वारून, शिराळे वारून, उखळू, खेडे, सोंडोलीकडे रस्ता बंद झाला आहे.

  – सोष्टेवाडीजवळ पाणी आल्याने मलकापूर ते अनुस्कुरा रोड बंद झाला आहे.

  – कडवी नदी पुलावर पाणी आलेने मलकापूर ते शिरगाव रोड बंद झाला आहे.

  – चरण ते डोणोली रोड बंद झाला आहे.

  – नांदारी फाट्यावर पाणी आल्याने करंजफेन, माळापुडे, पेंढाखले रोड बंद झाला आहे.

  – करुंगळे ते निळे व कडवे ते निळे रोड बंद झाला आहे. उचत ते परळे रोड बंद झाला आहे. शिरोली दुमालाजवळील पेट्रोल पंप पूर्ण पाण्याखाली असून, बीड शेड ते शिरोली दुमाला पेट्रोल पंपपर्यंत जाता येते. पुढे आरळे गावापर्यंतच्या मुख्य राज्य मार्गावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहे.

  – पर्यायी रस्ता सुद्धा बंद आहे. कांचनवाडी ते भाटण वाडी रस्ता बंद आहे. सद्या पावसाचे प्रमाण जास्त आहे. पाऊस जोरात सुरू आहे. शिरोली दुमाला, सडोली दुमाला,सावर्डे दुमाला, चफोडी ,गर्जन, आरळेपर्यंतचा मुख्य राज्य मार्ग बंद आहे.

  – वेदगंगा नदीवरील मुरगूड ते कूरणी हा बंधारा पाण्याखाली गेला आहे.

  – पर्यायी रस्ता – निढोरी मार्गे वेदगंगा नदीवरील सुरुपली ते मळगे हा बंधारा पाण्याखाली गेला आहे.

  – पर्यायी रस्ता – सोनगे ते बानगे

  – वेदगंगा नदीवरील बस्तवडे ते आणुर पुल पाण्याखाली गेला आहे.

  – पर्यायी रस्ता – निपाणी मार्गे कागल कोल्हापूर, सोनगे ते बानगे मार्गे आणूर

  वरील सर्व वाहतूक ही बॅरिकेट लावून बंद करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिली आहे.

  राजाराम बंधारा पाणी पातळी
  ३७ ‘ फुट ११” इंच इतकी आहे.
  (पंचगंगा नदी इशारा पातळी – ३९ फूट व धोका पातळी – ४३ फूट आहे.)

  कोल्हापूर राधानगरी रोडवर घोटवडे येथील चव्हाण ओढा येथे 3 फूट रस्त्यावर पाणी आले आहे. तरी वाहतूक बंद आहे. सर्व वाहतूक घोटवडे ते ठीकपूर्ली स्टार्च कारखाना मार्गे वाहतूक सुरु आहे. मौजे पंगिरे तालुका भुदरगड येथील चिकोत्रा नदीला पूर आला असून, पुलावरून पाणी वाहू लागल्याने गारगोटी – गडहिंग्लज रोड बंद झाला आहे. बंदोबस्त लावण्यात आला आहे.