मराठा समाज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल; चंद्रकांत पाटील यांचा इशारा

कोरोनाच्या काळात बाकी सर्व काही करायला परवानगी असताना कोविडच्या नावाखाली राज्य सरकारकडून मुस्कटदाबी चालू आहे. मराठा आरक्षणासाठी समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असा इशारा  प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. कोल्हापूर येथे पत्रकारपरिषदेत बोलत ते होते.

    कोल्हापूर : कोरोनाच्या काळात बाकी सर्व काही करायला परवानगी असताना कोविडच्या नावाखाली राज्य सरकारकडून मुस्कटदाबी चालू आहे. मराठा आरक्षणासाठी समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असा इशारा  प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. कोल्हापूर येथे पत्रकारपरिषदेत बोलत ते होते.

    राज्य सरकारला चार जूनपर्यंत मुदत

    कोरोनाचे संकट आहे म्हणून आयुष्य थांबलेले नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी राज्य सरकारला चार जूनपर्यंत मुदत आहे. ही मुदत कोरोनामुळे वाढणार नाही व नंतर फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला भाजपा पाठिंबा देईल या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

    कोणत्याही नेत्याने आंदोलन केले तरी भाजपाचा पाठिंबा

    मराठा आरक्षणाला स्थगिती येण्यापूर्वी ज्या उमेदवारांची सरकारी नोकरीसाठीची निवड प्रक्रिया पूर्ण झाली होती व नेमणूकपत्र देणे बाकी होते त्यांना ते देण्यातही कोरोनाचा अडसर नाही. भाजप राजकीय पक्ष म्हणून आंदोलन करणार नाही. परंतु मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन होईल त्यामध्ये आम्ही पक्षाचा बिल्ला आणि बॅनर बाजूला ठेऊन सहभागी होऊ. खासदार छत्रपती संभाजीराजे यांना मराठा समाजाला आरक्षण मिळवायचे आहे. त्यांनी त्यासाठी नेतृत्व करावे, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. मराठा आरक्षणासाठी कोणत्याही नेत्याने आंदोलन केले तरी भाजपा पाठिंबा देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

    २० हजार गावात पक्षातर्फे सेवाकार्य

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. कोविडचे मोठे सावट आहे. त्यामुळे उत्सव न करता कोविडशी संबंधित सेवेचे काम करायचे निर्णय भाजपाने घेतला आहे. त्या दिवशी देशात एक लाख तर महाराष्ट्रात २० हजार गावात जाऊन पक्षातर्फे सेवाकार्य करण्यात येईल. पक्षातर्फे देशभरात ५० हजार बाटल्या रक्तदान करण्यात येणार आहे, असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.