त्या दिवशी कारमध्ये मंत्र्यांचा मुलगा असता तर त्यालाही मारलं असतं : चंद्रकांत पाटील

लखीमपूर खेरीमधील हिंसाचाराविरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक का दिली, हे अनाकलनीय असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच व्यापाऱ्यांना लखीमपूर प्रकरणाची अर्धी बाजू माहितीच नसल्याचा दावाही पाटील यांनी केला.

    कोल्हापूर : लखीमपूर खेरीमधील हिंसाचाराविरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक का दिली, हे अनाकलनीय असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच व्यापाऱ्यांना लखीमपूर प्रकरणाची अर्धी बाजू माहितीच नसल्याचा दावाही पाटील यांनी केला.

    चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

    निम्म्या व्यापाऱ्यांना लखीमपूरमध्ये नक्की काय घडलं, हेच माहिती नाही. त्यांना या प्रकरणाची केवळ अर्धी बाजू माहित आहे. लखीमपूर घटनेत जीप घुसली, त्यामध्ये चार जण चिरडले गेले, अत्यंत दुर्दैवी घटना आहे, अमानवी आहे. शेतकऱ्यांनी त्याची रिअॅक्शन म्हणून चार जणांना ठेचून मारलं, त्यानंतर केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा मुलगा त्या कारमध्ये असता तर त्यालाही मारलं असतं, मी त्या खोलात जात नाही, कारण तो माझा विषय नाही. या सगळ्यात केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलाला अटक झाली, आता त्याची चौकशी होईल, मग त्यासाठी महाराष्ट्र बंद करण्याची गरज काय होती, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. व्यापाऱ्यांनी केवळ शिवसेनेच्या भीतीने दुकानं बंद ठेवली आहेत. आम्हाला काही माहिती नाही, दुकान सुरु ठेवले तर उगाच दगड पडायचा, अशी अनेक व्यापाऱ्यांची भावना असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे हा बंद सपशेल फसला आहे. भाजप या महाराष्ट्र बंदचा निषेध करते. राज्यातील जनतेला हे नाटक कळतंय, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

    राज्यात शेतकऱ्यांचे खूप प्रश्न आहेत

    महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे खूप प्रश्न आहेत. राज्यात दोन मोठी वादळं येऊन गेलेत. वादळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानभरपाईचे आणि कर्जमाफीचे काय, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. एखाद्या सरकारने सत्तेत असताना बंदची हाक देण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडतोय. महाविकासआघाडीचे कार्यकर्ते व्यापाऱ्यांना भेटून दुकानं बंद करायला सांगत आहेत, दंडुके घेऊन फिरत आहेत. दुकानं बंद ठेवा नाहीतर परिणाम भोगा, अशा इशारा देत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.