भविष्यात प्रवाशांना कमी खर्चात करता येणार लालपरीचा प्रवास, डिझेल ऐवजी गॅसवर धावणार एसटी ; कधी मिळणार लाभ ?

    कोल्हापूर :  भविष्यात प्रवाशांना कमी खर्चात सक्षम सेवा देण्यासाठी महामंडळ विविध उपाययोजना राबवत आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातील (Maharashtra) तीन हजार एसटी बस (ST BUS) डिझेल ऐवजी गॅसवर धावण्यासाठी तांत्रिक बदल केले जात आहेत. यातून इंधन खर्चाची बचत होऊन कमी खर्चात सक्षम प्रवासी सेवा देता येणे एसटीला शक्य होणार आहे.

    महामंडळाच्या ताफ्यात जवळपास १८ हजार बस आहेत. प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी २०० ते ६०० बसचा ताफा आहे. यातून दररोज ३६ लाख प्रवाशांची वाहतूक होते. कोरोनामुळे (covid-19) फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी प्रवासी सेवा सुरू होती. त्यातून २५ टक्के महसूल जमा होत होता.

    दहा दिवसांत काही जिल्ह्यांत प्रवासी सेवा पुन्हा सुरू झाली. प्रवासी प्रतिसाद मात्र जेमतेम आहे. वर्षभरात आठशे कोटींच्या महसुलावर महामंडळाला पाणी सोडावे लागले. वर्षभरात एसटीला अभूतपूर्व तोटा झाला आहे. तरीही भविष्यात काटकसरीचे धोरण स्वीकारून प्रवाशांना जास्तीत जास्त चांगली सेवा देता येणार आहे.

    शंभर एसटी बस विजेवर

    प्रायोगिक तत्त्वावर शंभर बस विजेवर चालविण्यात येणार आहेत. त्यासाठीही तांत्रिक बदल केले जात आहेत. दोन महिन्यात प्रयोग यशस्वी होईल. त्यातील सर्वाधिक बस पुणे मार्गावर धावणार आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी चार्जिंग पॉईंटही करण्यात येत आहेत.