माणुसकीला काळिमा फासणारी घटना, आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे; चंद्रकांत पाटलांची मागणी

  कोल्हापूर : साकीनाका बलात्कार प्रकरणावर आता राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केलीय. माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे समाज हादरुन गेलाय. ज्या प्रकारे ही घटना घडली आहे, यात अनेकजण आहेत. कडक शिक्षा झाली पाहिजे. त्या शिवाय अशा प्रवृत्तींना धाक निर्माण होणार नाही. गेल्या चार दिवसातील ही सहावी घटना आहे. महिलांवर अत्याचार होत असताना कारवाई होत नसल्यामुळे अशा घटनांमधील सराईतपणा वाढल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

  फडणवीसांच्या काळात कायद्याचा धाक होता

  एका बाजूला कोविडचे निर्बंध आहेत, तर दुसरीकडे अशा घटना घडत आहेत. पोलीस काय करत आहेत? असा संतप्त सवालही चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अशा घटनांमध्ये सहभाग दिसतोय. तर इथे सरकार असल्यामुळे पोलिसांवर दबाव आणला जातोय. कमी कलमं लावली जात आहेत. राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही. पटापट जामीन होत आहे, असा आरोप करतानाच देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कायद्याचा धाक निर्माण झाला होता. पण आता पोलिसांवर राजकीय दबाव असेल तर काय होणार, अशी खोचक टीका पाटील यांनी केली आहे.

  कोविडच्या काळात आचारसंहितेच्या नावाखाली अतिरेक चालला आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला सूट दिली जातेय. तर इतरांना परवानगी काढायला लावली जातेय. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना हैराण करणं सुरु आहे, असा आरोपही पाटील यांनी केला.

  तसेचं पवार काहीही म्हणाले तरी काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाही. काँग्रेस आता पक्ष राहिला नाही. वैयक्तिक निर्णय घेतले जात आहेत. यातील बहुतेकजण सत्ता मिळते ना मग सहन करा असंच म्हणतील, असा खोचक टोलाही पाटील यांनी काँग्रेसला लगावला.

  पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

  मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन देताना, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुंबतील कोर्टाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला.