अजित पवार यांच्या भगिनींकडे आयकर विभागाची दुसऱ्या दिवशीही छापेमारी

कोल्हापुरातील बहीण विजयाताई मोहन पाटील यांच्या घरावर आणि कार्यालयात गुरुवारीदेखील आयकर विभागाने छापे टाकले होते. जवळपास दहा अधिकाऱ्यांच्या पथकाकडून गुरुवारी दिवसभर कागदपत्र आणि माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

  कोल्हापूर (Kolhapur). उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार यांच्या भगिनी (Ajit Pawar’s sister) कोल्हापुरातील विजया पाटील (Vijaya Patil) यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाने छापा (The Income Tax Department raid) टाकला. सकाळी ११ वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी (the Income Tax Department officials) दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा कार्यालयात दाखल होत झाडाझडती करण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर अजित पवारांचे पुत्र पार्थ यांच्या निकवर्तीयांच्या कारखान्यावरही दुसऱ्या दिवशी झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईमुळे नंदूरबारमध्ये उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे.

  पवार यांची कोल्हापुरातील बहीण विजयाताई मोहन पाटील यांच्या घरावर आणि कार्यालयात गुरुवारीदेखील आयकर विभागाने छापे टाकले होते. जवळपास दहा अधिकाऱ्यांच्या पथकाकडून गुरुवारी दिवसभर कागदपत्र आणि माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यानंतर शुक्रवारी पुन्हा सकाळी अकरा वाजता आयकर विभागाचे अधिकारी राजारामपुरीतील मुक्ता पब्लिशिंग हाऊस प्रायव्हेट लिमिटेड या कार्यालयात दाखल झाले. तर करवीर तालुक्यातील वाशी येथे असणाऱ्या राहत्या घरी देखील आयकर विभागाच्या सहा अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा छापा टाकला.

  पाहुणे गेल्यानंतरच बोलीन
  पाहुणे घरी आहेत. वेगवेगळ्या घरांमध्ये आहेत. त्यांचे काम चालू आहे. ते गेल्यानंतर मला जे काय बोलायचय ते बोलीन. मला जे बोलायचय ते काल मी बोललो आहे. नियमाने जे असेल ते जनतेसमोर येईल, त्यात घाबरण्यासारख काय आहे.
  — अजित पवार, उपमुख्यमंत्री

  आपल्याला चिंता नसते
  मला कळले की काल अजित पवारांकडे सरकारने काही पाहुणे पाठवले होते. ते पाहुणे येऊन गेले. पण या पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. तुम्हाला आठवते का, निवडणुकीच्या आधी बँकेच्या एका प्रकरणामध्ये मला ईडीने नोटीस पाठवली होती. त्या बँकेचा मी सभासद नव्हतो. त्या बँकेकडून मी कधी कर्ज घेतले नाही आणि तरीही मला नोटीस दिली. यामुळे सबंध महाराष्ट्राने भाजपाला वेडी ठरवले. सत्तेचा गैरवापर राज्यकर्ते कसा करतात याबाबत निश्चित लोक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.
  — शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

  अपना टाईम भी आयेगा
  ही राजकीय छापेमारी आहे. ज्याप्रकारे महाराष्ट्रामध्ये छापेमारी सुरू आहे, हे सुडाचे राजकारण आहे. काय होईल सांगता येत नाही. अजित पवार यांच्यावर राजकीय राग असू शकतो. हेही दिवस निघून जातील, दिल्लीत आमचेही दिवस येतील. ‘अपना टाईम भी आयेगा.’
  — संजय राऊत, खासदार, शिवसेना

  संघर्ष नवीन नाही
  ते नुसते दादाचे नातेवाईक नसून आमचे एकत्र कुटुंब आहे. दिल्ल्लीने महाराष्ट्रावर कितीही अन्याय केला तरी दिल्लीच्या तक्तासमोर महाराष्ट्राचा सह्याद्री कधीच झुकणार नाही. आमच्यावर भारतीय संस्कृती तसेच कै. यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. सत्तेत असतानाही आम्ही कधीच सुडाचे राजकारण केले नाही. पवार कुटुंबियाला संघर्ष नवीन नाही.
  — सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी

  पुण्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे आंदोलन
  आयकर विभागाच्या या कारवाईनंतर अजित पवार यांच्या समर्थनात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काऊन्सिल हॉलसमोर मानवी साखळी तयार करून या कारवाईचा निषेध केला. यात अनेक महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.