jayant patil

उंचगी लघु पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न(problems of project affected) संबंधित यंत्रणेने येत्या १५ जूनच्या आत मार्गी लावावेत, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील(Jayant Patil) यांनी दिले.

    कोल्हापूर: कोल्हापूर(Kolhapur) जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उंचगी लघु पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न संबंधित यंत्रणेने येत्या १५ जूनच्या आत मार्गी लावावेत, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील(Jayant Patil) यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात उंचगी प्रकल्पग्रस्तांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

    मंत्री पाटील पुढे म्हणाले, या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मंत्रालय स्तरावरुन जी मदत लागेल ती करु, तसेच या प्रकल्पासाठी ज्यांची जमीन अधिग्रहण केली आहे त्या संबंधिताना योग्य तो आर्थिक मोबदला देण्यात यावा. कोणाचेही आर्थिक नुकसान होता कामा नये. या प्रकल्पातील आक्षेपार्ह जमिनीबाबत, अडचणीबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावून पर्यायी योग्य तो मार्ग काढावा. ज्यांची घरे बाधित झाली आहे, त्यांनाही योग्य मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करु, असेही मंत्री पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

    या प्रकल्पामध्ये २८८ प्रकल्पग्रस्त असून चार गावे बाधित आहेत. संबंधित बाधित प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी ४० लाख रुपये इतक्या रक्कमेचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती आजरा – भुदरगडचे प्रांताधिकारी संपत खिलारे यांनी दिली. तर या प्रकल्पामुळे बाधितांना संकलन रजिस्टर नुसार जमीन देण्यात यावी अशी अग्रही मागणी प्रकल्पाग्रस्तांनी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. तत्पूर्वी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी या आढावा बैठकी पाठीमागची पार्श्वभूमी मंत्री महोदयांना सांगितली.

    या बैठकीसाठी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जलसंपदा अधीक्षक अभियंता सुर्वे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, तहसिलदार (पुनर्वसन) वैभव पिलारे यांच्यासह ए.वाय.पाटील, विजय देवणे, संपत देसाई, संजय तरडेकर, अशोक जाधव, धनाजी गुरव आदी उपस्थित होते.