शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीने जयप्रभा व शालिनी सिनेटोन कृती समितीला पाठिंबा 

    कोल्हापूर : येथील शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीने जयप्रभा व शालिनी सिनेटोन कृती समितीला जाहीर पाठिंबा देण्यात आला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात झालेल्या चर्चेत अध्यक्ष डाॅ. गुरुदत्त म्हाडगुत म्हणाले, राजर्षि शाहू महाराज यांच्या राजाश्रयामुळे कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण भारतात अनेक दिग्गज व कसदार कलाकार व कलाक्षेत्राशी निगडीत तज्ज्ञ घडले आणि घडत आहेत. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून जयप्रभा व शालिनी सिनेटोनकडे पाहावे लागेल.

    मराठी चित्रपटसृष्टीने या जागांमुळे सुवर्णकाळ पाहिला. परंतु बाहेरून आलेल्या व्यापारी प्रवृत्तीच्या लोकांनी करवीरवासियांच्या भावनांचा बाजार मांडला. ही प्रवृत्ती आम्ही शाहूप्रेमी कधीही खपवून घेणार नाही. उपाध्यक्ष राहुल चौधरी म्हणाले, कृती समितीच्या या लढाईत आम्ही आक्रमकपणाने व कायदेशीरमार्गाने पाठीशी राहू. कलाक्षेत्राशी मांडलेला बाजार व नवोदित कलाकार घडवण्याच्या मार्गात काटे पेरणाऱ्या स्वार्थी प्रवृत्तीला कोल्हापूरी हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही.

    चित्रपट निर्मिते संदीप जाधव यांनी निवेदनाचे वाचन करून समन्वयकाची भूमिका विषद केली. यावेळी पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. चित्रपट निर्मिते सुरेंद्र पन्हाळकर, कृती समिती अध्यक्ष अर्जुन नलावडे, महामंडळाचे संचालक शरद चव्हाण, व्यवस्थापक बोरगावे तसेच राष्ट्रीय जलतरणपटू पृथ्वीराज जगताप, संचालक निलेश कांबळे, निखिल जाधव, अजय पाटील, युवराज लोखंडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष सचिन जाधव उपस्थित होते.