जयसिंगपूर पालिकेला मिळणार नवीन प्रशासकीय इमारत

  जयसिंगपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण शहर असणाऱ्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या इमारतीची दुरावस्था झाल्याने सातत्याने त्याची दुरूस्ती करून घ्यावी लागते. शिवाय प्रशासकीय कामाला इमारत अपुरी पडत असल्याने जयसिंगपूर पालिकेची अत्याधुनिक सर्वसोयीनियुक्त नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. यासाठी 9 कोटी 62 लाख रूपयेचा निधी मंजूर झाला असून, त्याचे टेंडर प्रक्रिया सुरू आहे. यात सर्व विभागाच्या प्रशस्त कार्यालयासह पाच मजली इमारत उभारण्यात येणार असून, याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे जयसिंगपूर शहराच्या वैभवात आणखीन भर पडणार आहे.

  राजर्षी शाहू महाराजांनी 103 वर्षांपूर्वी सांगलीला पर्यायी बाजारपेठ म्हणून उदगांवच्या फड्या माळावर जयसिंगपूर शहराची स्थापना केली. त्यामुळे येथे ग्रामपंचायत कार्यालय कार्यरत होते. कालांतराने शहराचा विस्तार वाढल्याने 1 एप्रिल 1942 साली याठिकाणी नगरपालिका स्थापन झाले. यावेळी पालिकेची कौलारू इमारत होती. कालांतराने ही इमारत अपुरी पडल्याने नवी प्रशासकीय इमारत उभारण्यात आली होती. यामध्ये सर्व प्रशसकीय कारभार बांधकाम विभाग, मुख्याधिकारी यांची केबीन व ग्रंथालय कार्यरत आहे. तर जुन्या कौलारू इमारतीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष केबिन, रेकॉर्ड रूम आहे. तर आतील जुन्या पत्र्याच्या इमारतीत सभागृह, आरोग्य विभाग व पाणी पुरवठा विभाग व स्वच्छतागृह आहे. या सर्वच विभागाच्या इमारतीची मोठी दुरावस्था झाली होती. यासाठी गेल्या वर्षभरापासून पालिकेकडून नवीन इमारतीच्या मान्यतेसाठी प्रयत्न सुरू होते.

  दरम्यान, राज्य शासनाच्या वैशिष्टपूर्ण योजनेतून जुनी इमारत पाडून नवी इमारत बांधण्यासाठी 9 कोटी 62 लाख रूपयांचा निधी पालिकेकडे प्राप्त झाला आहे. याची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. ही नवीन प्रशासकीय इमारत पाच मजली होणार असून, यात दोन तळघर पार्किंग असणार आहे. उत्पन्नासाठी 12 दुकानगाळे, पालिका विभागासाठी स्वतंत्र कक्ष, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष कक्ष, अपगांसाठी रॅम्प, सभागृहे, तीन जीने, दोन लिफ्ट, देखावासाठी दोन  गार्डन अशा सर्व सोयीनियुक्त ही इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये विद्युत बचतीसाठी सौरऊर्जे, रेनवॉटर हार्वेस्टींग, भूकंप रोधक यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा यासह निसर्गाचा समतोल राखणारी ग्रिन बिल्डिंग साकारणार आहे. ही इमारत बांधण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी आहे. तरी पालिकेने एक वर्षात इमारत उभी रहावी यासाठी खास नियोजन केले आहे. त्यामुळे जयसिंगपूर शहराच्या वैभवात पालिकेची इमारत भर टाकणार आहे.

  राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नांना यश

  जयसिंगपूर पालिकेत असलेल्या सर्वच विभागाच्या इमारती खराब झाल्या होत्या. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी नगररचनासह अनेक विभागाच्या परवानग्या घेतल्या आहेत. परवानगी घेऊन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नांतून 9 कोटी 62 लाख निधी मंजूर झाला आहे. यातून प्रशस्त प्रशासकीय इमारत साकरण्यात येत आहे. त्यामुळे ही इमारत लवकरच सेवेत येईल. त्याचबरोबर शहराच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहू.

  – संजय पाटील यड्रावकर, उपनगराध्यक्ष, जयसिंगपूर