जोतिबाच्या नवरात्रोत्सवाला पहाटे तीन वाजता महाघंटेच्या नादाने सुरुवात

जोतिबाच्या नवरात्र उपवासाची गुरुवार पासून सुरुवात झाली. यंदाचे संपूर्ण नऊ दिवसाचे नवरात्र उपवास असल्याने नवीन उपवासधारकांची संख्या वाढली आहे. दोनवेळा फराळ, अनवाणी, उपरणे-धोतराचा पेहराव, प्रवास कमी असे जोतिबा नवरात्र उपवासाचे स्वरूप असते.

    वारणानगर : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या नवरात्रोत्सवाला (Navratri 2021) गुरुवारी मोठ्या धार्मिक उत्साहात प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला श्री जोतिबाची नागवेली पानातील आकर्षक महापूजा बांधण्यात आली. तसेच धुपारती सोहळ्याने घटस्थापनेचा धार्मिक विधी करण्यात आला.
    श्री जोतिबाच्या नवरात्रोत्सवाचा प्रारंभ पहाटे तीन वाजता महाघंटेच्या नादाने झाला. पहाटे चार वाजता श्री जोतिबा मूर्तीचे मुखमार्जन करून पाद्यपूजा करण्यात आली.पहाटे पाच वाजता महाभिषेक सोहळा संपन्न झाला. गुरुवारी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला नागवेली पानातील आकर्षक अलंकारित महापूजा बांधण्यात आली. सकाळी नऊ वाजता श्री जोतिबा मंदिरात मंत्रोच्चारच्या स्वरात घट बसविण्यात आले.
    साडेनऊ वाजता उंट, घोडे, वाजंत्री, महालदार, चोपदार, देवसेवकांच्या लवाजम्यासह श्री यमाई मंदिराकडे घुपारती सोहळा निघाला. श्री यमाई मंदिर, श्री तुकाई मंदिरात घट बसविण्याचा विधी झाला. सुवासिनींनी पाणी घालून धुपारतीचे दर्शन घेतले. यावेळी सुगंधी दूध वाटप करण्यात आले. कपुरेश्वर तीर्थावर दिवे सोडण्यात आले. घुपारती समवेत श्रींचे पुजारी देवसेवक,देवस्थान समितीचे अधिकारी, सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते. दुपारी एक वाजता तोफेची सलामी देवून अंगारा वाटप करण्यात आला. रात्री भजनाचा कार्यक्रम झाला.
    उपवासधारक संख्या वाढली
    जोतिबाच्या नवरात्र उपवासाची गुरुवार पासून सुरुवात झाली. यंदाचे संपूर्ण नऊ दिवसाचे नवरात्र उपवास असल्याने नवीन उपवासधारकांची संख्या वाढली आहे. दोनवेळा फराळ, अनवाणी, उपरणे-धोतराचा पेहराव, प्रवास कमी असे जोतिबा नवरात्र उपवासाचे स्वरूप असते.
    खडकलाटची पाने
    गुरुवारी महापूजेसाठी खडकलाट (ता.चिकोडी) येथील एका भाविकाने पाच हजार नागवेलीची (खाऊची) पाने आणली होती. श्री क्षेत्र जोतिबा डोंगर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला श्री जोतिबाची बांधण्यात आलेली नागवेली पानातील आकर्षक अलंकारित बैठी महापूजा.