kolhapur mpsc exam fake certificate scam crime arrested
एमपीएससी परीक्षा बनावट प्रमाणपत्र प्रकरण; माजी क्रीडा उपसंचालकासह दोघांना अटक

अटक केलेल्यांची संख्या आता पाचवर गेली आहे. दरम्यान, काल अटक करून लगेच जामीन मिळाल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी याची माहिती दिल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. तत्कालीन क्रीडा उपसंचालक अनिल मारुती चोरमले (वय ५४, रा. धनकवडी, पुणे) व क्रीडा मार्गदर्शक प्रशांत जिवाजी पवार (वय ५३, रा. गुलमोहर कॉलनी, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षकपदासाठी पडताळणी न करताच उमेदवाराला क्रीडा प्रमाणपत्र (sports certificate) दिल्याप्रकरणी तत्कालीन क्रीडा उपसंचालकासह क्रीडा मार्गदर्शकाला जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी अटक (arrest) केली. याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या आता पाचवर गेली आहे. दरम्यान, काल अटक करून लगेच जामीन मिळाल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी याची माहिती दिल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. तत्कालीन क्रीडा उपसंचालक अनिल मारुती चोरमले (वय ५४, रा. धनकवडी, पुणे) व क्रीडा मार्गदर्शक प्रशांत जिवाजी पवार (वय ५३, रा. गुलमोहर कॉलनी, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

२०१६मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेवेळी विजय सदाशिव बोरकर (रा. सांगली) याने सांगली येथील एका जिम्नॅस्टिक असोसिएशनचे प्रमाणपत्र सादर केले होते. याबाबत शंका आल्याने क्रीडा व युवक सेवा संचालनालय कोल्हापूर विभागाचे क्रीडा अधिकारी शंकर भास्करे (रा. सांगली ) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी असोसिएशनचा सांगली जिल्हाध्यक्ष दीपक बाबासाहेब सावंत, संघटनेचा राज्य सचिव महेंद्र आनंद चेंबूरकर व खेळाडू विजय सदाशिव बोरकर या तिघांना अटक केली होती. पण या प्रकरणातील तत्कालीन क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले व मार्गदर्शक प्रशांत पवार हे दोघे फरार झाले होते. सोमवारी या दोघांना अटक करण्यात आली.