गणेशोत्सव काळात सर्व निर्बंध हटवण्याची कुंभार समाजाची मागणी

  शिरोळ : फिरत्या चाकावर ओल्या मातीला हाताने आकार देऊन कुंभार नानाविध भांडी तयार करतो. त्याच हाताने मातीतून देवाच्या सर्वांगसुंदर मूर्ती घडविल्या जातात. या पारंपरिक व्यवसायावरच शेकडो कुटुंबाच्या घरातील दोनवेळची चूल पेटते. पण, महापूर व कोरोना या मोठमोठ्या संकटामुळे कुंभार समाजाच्या व्यवसायाला मोठी झळ बसली असून, कुंभार समाजाच्या विकासाचे चाकच रुतले आहे.

  मार्च महिन्यापासून सुरू झालेली होरपळ संपलेली नाही. या संकटातून कुंभार समाज कसा सावरतो आहे. त्यामुळे येणाऱ्या गणेशोत्सव काळात शासनाने कुंभार समाजावर आर्थिक संकट कोसळेल असा कोणताही निर्बंध लागू नये, अशी मागणी शिरोळ तालुक्यातील कुंभार समाज वर्गातून होत आहे.

  कुंभार समाजाचा पारंपारिक व्यवसाय हा मातीच्या वस्तू बनविणे आहे. मातीपासून भांडे, मूर्ती तयार करून विक्री करणे. कुंभार समाज दिवसरात्र घाम गाळून दरवर्षी हंगामाच्या दिवसात भांडे, सुरई, दिवा-पणती, कलश, मटक्यासारख्ये वस्तू मातीपासून तयार करतात. त्यानंतर त्याची विक्री करुन आपला उदरनिर्वाह करतात. मागील वर्षात अनेक सण येऊन गेले व आता गणेशोत्सव येणार असून, कुंभार समाज आपल्या कामात गुंतलेला आहे. कुंभार समाज आता गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामात व्यस्त आहे. मात्र, कोरोनाच्या काळात मूर्त्यांची विक्री होणार की नाही, याची चिंता त्यांना सतावत आहे.

  उन्हाळ्यात लागणारे रांजन माठ, मडके व इतर उपयोगी वस्तू तयार करून त्या वस्तूची विक्री करण्याचा हंगाम असून, दोन पैसे कमावून आपला संसार कसाबसा चालवतात. पण, मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली टाळेबंदी त्यानंतर नागरिकांमधील कोरोनाची भीती यामुळे कुंभार समाज आर्थिक संकटात सापडला. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने अद्याप कुंभार समाजात असलेल्या आर्थिक संकटात सावरण्यासाठी कोणतीही भरीव मदत केली नाही, अशातच शासनाने कुंभार समाजाला चार फुटांपर्यंतचीच मूर्ती तयार करण्याचे निर्बंध लावले आहे.

  इतकेच नव्हे तर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘एक गाव, एक गणपती’चे आवाहन केल्यास कुंभार समाज पूर्णपणे आर्थिक संकटात सापडणार आहे. त्यामुळे शासनाने या वर्षीच्या गणेश उत्सवाला कोणताही निर्बंध लावू नये, अशी मागणी शिरोळ तालुक्यातील कुंभार समाज बांधवातून होत आहे.

  कुंभार समाजाला शासनाने सावरावे

  2005 व 2019 चा भयानक महापूर, कोरोनाची वेश्विक महामारीत लादलेला लॉकडाऊन यामुळे कुभांर समाज मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यातून कुंभार समाज सावरत असताना शासनाकडून गणेश मुर्तीला चार फुटापर्यंत निर्बंध घातले आहे. ते ही कुंभार समाजाने मान्य केले, पण शासनाने एक गांव एक गणपतीचे आवाहन करू नये, तसेच महापूर आणि कोरोनाच्या संकटात सापडलेल्या कुंभार समाजाला अर्थिक मदत करुन सावरावे.

  – अमर कुंभार, युवा अध्यक्ष – कुंभार समाज शिरोळ तालुका