पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत १३६ जणांना कर्ज उपलब्ध : आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी

सर्व्हेक्षण अधिक गतीमान केले जाइल. आतापर्यंत १ हजार ४६३ जणांनी आपले अर्ज ऑनलाईन भरले असून त्यापैकी ५०१ जणाचं अर्ज मंजुर करण्यात आले आहेत. तर १३६ जणांना १३ लाख ६० हजाराचे अनुदान उपलब्ध झाले आहे.

कोल्हापूर : पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत ५०१ जणांचे अर्ज मंजुर करण्यात आले असून १३६ जणांना १३ लाख ६० हजाराचे कर्ज उपलब्ध झाल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी आज दिली.

केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगून आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी म्हणाले की, महानगरपालिका क्षेत्रात जुलैपासून या योजनेंची व्यापक जनजागृती केली असून आतापर्यंत ४ हजार १०९ फेरीवाल्याचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यापुढेही हे सर्व्हेक्षण अधिक गतीमान केले जाइल. आतापर्यंत १ हजार ४६३ जणांनी आपले अर्ज ऑनलाईन भरले असून त्यापैकी ५०१ जणाचं अर्ज मंजुर करण्यात आले आहेत. तर १३६ जणांना १३ लाख ६० हजाराचे अनुदान उपलब्ध झाले आहे.

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत नागरी पथ विक्रेत्यांना एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह १० हजार रुपयांपर्यंतचे बँका मार्फत विनाकारण फिरते भांडवल कर्ज म्हणून उपलब्ध करुन दिले जाणार असून या कर्जांवर आरबीआयच्या प्रचलित दराप्रमाणे व्याजदर लागू राहील. या कर्जाची दरमहा हप्त्याने परतफेड केल्यास ७ टक्के व्याज अनुदानाचा लाभ मिळतो. तसेच नियमित डिजीटल व्यवहार केल्यास कॅशबॅकसाठी लाभार्थी पात्र ठरतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड व आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर, बँक पासबुक, मतदार ओळखपत्र आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी २४ मार्च २०२० रोजी व त्यापुर्वीचे कोल्हापूर शहरामध्ये विक्री/व्यवसाय करणारे पथविक्रेते, महापालिकेने केलेल्या फेरीवाल्यांच्या सर्व्हेक्षणात आढळलेले पंरतू त्यांना विक्री प्रमाणपत्र/ओळखपत्र दिले गेले नाही असे पथविक्रेते, महापालिकेने केलेल्या फेरीवाल्यांच्या सर्व्हेक्षणापासून जे विक्रेते वंचित राहिले आहेत. किंवा ज्यांनी सर्व्हेक्षण पुर्ण झाल्यानंतर विक्री सुरु केली आहे. त्यांनी शिफारसपत्रासाठी अर्ज करावा, कोल्हापूर शहरातील रहिवासी नसलेले परंतू शहरामध्ये व्यवसाय करणारे विक्रेते/फेरीवाले, ज्या पथविक्रेत्यांचा सर्व्हे झाला नाही त्यांनी आपला Apply for LOR येथे ऑनलाईन अर्ज करुन शिफारसपत्राची मागणी करावी. शिफारस पत्र मिळाल्यानंतर ऑनलाईन कर्ज मागणी अर्ज करावा.

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेच्या लाभासाठी पथविक्रेत्यांनी https://pmsvanidhi.mohua.gov.in या वेबसाईटवर अर्ज करावा असे आवाहनही आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.