राज्यात लवकरच यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ ; मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी मंत्रालयामध्ये वस्त्रोद्योग विभागातील लोकप्रतिनिधी, यंत्रमागधारक आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी तसेच वस्त्रोद्योगातील तज्ञ मंडळींची बैठक आयोजित केली होती. बैठकीच्या प्रारंभी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी, यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाचे स्वरूप कसे असावे, त्यासाठी निधी कसा उभारायचा या संदर्भात सूचना करण्यास सांगितले.

    इचलकरंजी : राज्यातील यंत्रमाग कामगारांच्यासाठी स्वतंत्र यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या कल्याणकारी मंडळासाठी असंघटित क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांच्या विविध प्रश्‍नासंदर्भात नेमण्यात आलेल्या तीन समित्यांच्या शिफारशी  व आज झालेल्या बैठकीतील सूचनांचा सर्वंकष विचार करण्यात आला. बांधकाम व माथाडी कामगारांच्या धर्तीवर हे स्वतंत्र यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ असणार आहे. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती.
    यंत्रमाग कामगार हा असंघटित असल्यामुळे त्याला कोणताही लाभ मिळत नाही. त्यामुळे यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ  स्थाापन करावे अशी मागणी पंधरा ते वीस वर्षापासून प्रलंबित आहे. या संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी मंत्रालयामध्ये वस्त्रोद्योग विभागातील लोकप्रतिनिधी, यंत्रमागधारक आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी तसेच वस्त्रोद्योगातील तज्ञ मंडळींची बैठक आयोजित केली होती.
    बैठकीच्या प्रारंभी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी, यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाचे स्वरूप कसे असावे, त्यासाठी निधी कसा उभारायचा या संदर्भात सूचना करण्यास सांगितले. तसेच माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि माजी मंत्री राजेंद्र गावित या तीन विविध समित्यांनी सुचविलेल्या शिफारशी आणि नवीन सूचना मांडाव्यात असे सांगितले.
    आमदार प्रकाश आवाडे यांनी, यंत्रमाग कामगार हा प्रदीर्घ काळापासून असंघटित आहे. त्यामुळे त्याला कोणताही लाभ मिळू शकत नाही. म्हणूनच त्यांना बांधकाम कामगाराप्रमाणे स्वतंत्र कामगार मंडळाची गरज आहे. त्यासाठी सुताच्या किमतीवर अथवा शेकड्यावर नव्हे तर प्रति किलोवर सेस लागू करावा. त्यातून दरवर्षी सातशे ते आठशे कोटी रुपये जमा होतील.  संपूर्ण राज्यात जवळपास नऊ लाख यंत्रमाग कामगार आहेत. या कामगारांना इएसआय सुविधा, सुट्टीचा पगार, दवाखाना, बोनस, त्यांच्या पाल्यांचे शिक्षण  यासाठी येणारा खर्च प्रचंड आहे. त्यामुळे सुतावर प्रतिकिलो एक रुपया प्रमाणे सेस लावल्यास त्यातून जमा होणारा निधी मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी खर्च करता येईल. कामाचे स्वरूप कसे असेल ते वर्षभर पाहूया. त्यानंतर त्यामध्ये काय बदल करायचा असल्यास तो करता येईल, असे सांगत या मंडळात यार्न आणि वायडिंग कामगारांचाही समावेश व्हावा अशी सूचना मांडली.  त्यावर यार्न व वायडिंग कामगारांच्या समावेशाबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली. अखेर चर्चेअंती स्वतंत्र यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास सर्वांनी मान्यता दिली.

    या बैठकीसाठी कृषी मंत्री दादाजी भुसे , आमदार प्रणिती शिंदे , आमदार अनील बाबर, सुभाष देशमुख, मुनीफ इस्माईल, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेदसिंगल, विकास आयुक्त (असंघटीत कामगार) डॉ.अश्‍विनी जोशी, कामगार आयुक्त सुरेश जाधव यांच्यासह माजी आमदार नरसय्या आडम, मदन कारंडे,सतीश कोष्टी, शामराव कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, दत्ता माने, भरमा कांबळे आदींसह तसेच मालेगाव, भिवंडी, सोलापुर, सांगली व इचलकरंजी केंद्रातील मालक संघटना व कामगार संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.