मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर कोल्हापुरात महाविकास आघाडी ‘चार्ज’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली.

    मुरगूड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली. पण या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष ‘चार्ज’ झाल्याचे चित्र दिसत आहे.

    किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेनंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. किरीट सोमय्या यांचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. चुकीची माहिती देऊन मला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले आहे, याचे खरे सूत्रधार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हेच असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला.

    पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांचा उल्लेख ‘बिचारा’ असा केला. त्यांना धड साखर कारखान्याचे नावही उच्चारता येत नाही, अशा व्यक्तीला चुकीची माहिती देण्यात आली. त्यांनी कोल्हापूर येथे येऊन चौकशी केली असतील तर त्यांना खरे खोटे काय हे समजले असते.

    सार्वजनिक जीवनात स्वतःला उभे करण्यासाठी चाळीस चाळीस वर्ष राबलो. लोकांची सेवा केली. राजकीय जीवनात कष्टाने उभी केलेली प्रतिमा कोणीही खराब करू शकत नाही. किरीट सोमय्या ‘बिचारे’ असले तरी माझ्यावर लोकांनी टाकलेल्या विश्वासास तडा जाऊ नये म्हणून त्यांच्यावर शंभर कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असेही त्यांनी सांगितले. यावेळी सोमय्यांना चुकीची माहिती देणारे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांचा पैरा योग्य वेळी फेडू असा इशारा त्यांनी दिला.

    समरजीत घाटगे यांनी याबाबत बोलताना गल्लीबोळातील धमक्या मला देऊ नयेत असा प्रतिहल्ला मुश्रीफ यांच्यावर केला. अब्रू नुकसानीच्या दाव्याची खिल्ली उडवत चंद्रकांत पाटील यांनी दावा दाखल करण्यासाठी कोर्टात भरण्यासाठी व्हाइट मनी आहे का ? असा सवाल केला.

    या सर्व घटनांचे पडसाद कागल मतदारसंघासह कोल्हापूर जिल्ह्यात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अनेक ठिकाणी किरीट सोमय्या व भाजप यांचा निषेध करण्यात आला. समाज माध्यमांवर चंद्रकांत पाटील समरजित घाटगे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर देताना ‘कागल कनेक्शन’चा उल्लेख केला.सॊमय्या यांनी ‘संताजी धनाजी कारखाना” असा उल्लेख केल्याचा संदर्भ देत सोमय्या यांना पुढे करून चंद्रकांत पाटील आणि समरजित घाटगे डाव साधत आहेत असे सूचित केले.

    या प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यातील आघाडीचे अनेक राजकीय नेते मुश्रीफ त्याच्या पाठीशी उभे राहीले असे चित्र दिसत आहे. पारंपारिक विरोधक माजी आमदार संजय घाटगे यांनीही ,”मुश्रीफ यांच्यावरील आरोप लोक हिताला बाधा आणणारे आहेत. हे आरोप दुर्देवी व दखलपात्र असल्याचेही त्यांनी सांगितले.”

    महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपला पुढून कुठला आहे एका मजल्यावर ते आरोप करतात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना बरे वाटावे म्हणून मुस्लिम यांच्यावर देशातून सवंग लोकप्रियता साठी आरोप करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व गोष्टी त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत, असे पत्रक गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, भैया माने, कोल्हापूर राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर के पवार जिल्हाध्यक्ष के. वाय. पाटील यांनी काढले.

    महाविकास आघाडीचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सोमय्या यांच्या आरोपाचा निषेध केला असून, जिल्ह्याचे व महाविकास आघाडीचे नेते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असे पत्रक काढले आहेत. गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले,”मुश्रीफ भाजपला पुरून उरतील. आजपर्यंत अनेक संकटे परतवून लावणारे मुश्रीफ या संकटावर ही ताकदीने मात करतील.”

    एकंदरीत या घटनेचा राजकीय फायदा कोणाला होणार याचे उत्तर भविष्यात मिळेल.पण सध्या वातावरण ढवळून निघाले असून राष्ट्रवादी काँग्रेस चार्ज अप झाली आहे. यानिमित्ताने मुश्रीफ यांनी शक्तीप्रदर्शनाची संधी साधली असे दिसून येते.