दुचाकीचोरांवर मोठी कारवाई; सुमारे पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

मोटरसायकल, कार आणि घरफोडी करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज ताब्यात घेतले.

    कोल्हापूर : मोटरसायकल, कार आणि घरफोडी करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज ताब्यात घेतले. सचिन आगलावे (वय २१, रा. शाहू कॉलनी, विक्रम नगर), राहुल चौधरी (वय २६, शाहू कॉलनी, विक्रमनगर), ऋषिकेश कुकडे (वय २१, रा.कसबा तारळे, राधानगरी), दीपक सूर्यवंशी (वय २२,रा. कसबा तारळे, राधानगरी) अशी त्यांची नावे असून, त्यांच्याकडून बारा मोटरसायकली, एक कार असा सुमारे पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    गेल्या काही महिन्यात कोल्हापूर शहर आणि उपनगरांमध्ये मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी मोटरसायकल चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे बेंगलोर महामार्गावर सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले आहे. सचिन आगलावे, राहुल चौधरी, ऋषिकेश कुकडे आणि दीपक सूर्यवंशी अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १२ मोटरसायकल चोरी, एक कार चोरी आणि एक घरफोडीचा गुन्हा असे १४ गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून १२ मोटरसायकली व एक कार असा सुमारे पावणेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली आहे.

    ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, सुनील कोळेकर अमोल कोळेकर, अजित वाडेकर, पांडुरंग पाटील, नितीन चौथे, अर्जुन बंदरे, तुकाराम राजगिरे, संदीप कुंभार, सागर काढावे, महेश गवळी, ओमकार परब, कृष्णात पिंगळे, संजय पडवळ, संतोष पाटील, अजय काळे, चंदू ननवरे, रणजीत पाटील, अनिल जाधव, राजेंद्र वरडेकर यांनी केली आहे.