maratha morcha in kolhapur

मराठा क्रांती मोर्चाने डॉ.तन्मय व्होरा(Tanmay Vora) यांच्या सुर्या हॉस्पिटलमध्ये (Surya Hospital) आज जोरदार आंदोलन केले.

  कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) मराठा आरक्षण(Maratha Reservation) रद्द केल्याने मागील काही वर्षात एमपीएसच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रद्द कराव्या.अशा मागणीचे पत्र सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या राज्यस्तरीय ऑर्गनायझेशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.कोल्हापूर येथील सुर्या हॉस्पिटलचे डॉ.तन्मय व्होरा या ऑर्गनायझेशनचे संचालक आहेत.

  वेबसाईटवर शोध घेत असताना या आशयाचे पत्र सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या हाती लागले.त्यावरून संतप्त झालेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली.मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने जाऊन डॉ. व्होरा यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रचंड राडा केला.जोरदार घोषणाबाजी करत हॉस्पिटलचा फलक सुद्धा फाडून टाकला. डॉ.व्होरा यांनी हे पत्र मागे घेऊन मराठा समाजाची माफी मागावी,अशी मागणी केली.अखेर आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे डॉ.तन्मय व्होरा याने सर्वांसमोर येत जाहीर माफी मागितली.

  याबाबत सविस्तर वृत्त असे की, सेव्ह मेरिट सेव्ह नेशन नावाची नांदेड येथील नोंदणी कृत संस्था आहे. ही संस्था राज्य स्तरावर काम करते.या संस्थेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले. त्या पत्रात २०१३ आणि २०१४मध्ये एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरीत घेऊ नये,असा उल्लेख आहे. ज्या लेटरहेड वर हे पत्र टाइप करण्यात आले आहे त्यावर कोल्हापूरच्या डॉ.तन्मय व्होरा यांचा संचालक म्हणून उल्लेख आहे.

  सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या मारवाडी लोकांच्या संस्थेने मराठा आरक्षणाच्या विरोधात लढाई लढायला सुरुवात केली आहे.या ऑर्गनायझेशनसाठी डॉ.तन्मय व्होरा याने २० लाख रुपये देणगी दिल्याचे आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला. हा डॉ.व्होरा कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत राहून मराठा समाजाच्या विरोधात काम करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका घेऊन त्याच्या व्होरा सायकल कंपनी, व्होरा ट्रान्सपोर्ट अशा अन्य व्यवसायावरसुद्धा कोल्हापूरच्या मराठा समाजाने बहिष्कार घालावा असे आवाहन यावेळी सकल मराठा मोर्चाचे सचिन तोडकर यांनी केले.

  तर दिलीप पाटील म्हणाले, मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही हा लढा लढत आहोत,साडेसहा हजार तरुणांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.आणि अशा परावृत्त जर कोल्हापुरात राहून मराठा आरक्षणाच्या विरोधात काम करत असतील तर त्यांना आम्ही यापुढेही सोडणार नाही.

  डॉ.तन्मय व्होराने हॉस्पिटलमधून खाली येऊन सर्व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर सकल मराठा समाजाची माफी मागावी अशी भूमिका घेतल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांच्या प्रयत्नामुळे अखेर डॉ.तन्मय व्होरा यांनी सर्वांसमोर येत आपला या पत्राशी संबंध नाही,मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक होऊन या ठिकाणी आल्यानंतर या पत्राबाबत मला कळाले आहे तरी देखील जर माझ्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो असे सांगून माफी मागितली. तरीही २० लाख रुपये सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ऑर्गनायझेशनला का दिले या प्रश्नावर धारेवर धरत आक्रमक आंदोलकांनी हॉस्पिटलवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना ताब्यात घेतले. हॉस्पिटल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.