मराठा आरक्षण : भाजपामध्ये मतभेद; संभाजीराजे एकाकी

मराठा आरक्षण मिळवण्यासाठी कोणता मार्ग हाताळायचा यावरून भाजपचे खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपमध्ये मतभेद समोर आले आहेत. तूर्तास संघर्ष न करता सरकारला सहकार्य करण्याची संभाजीराजेंची भूमिका आम्हाला अमान्य आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात असून या मुद्यावरून भाजपामध्ये संभाजी छत्रपती एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

    कोल्हापूर : मराठा आरक्षण मिळवण्यासाठी कोणता मार्ग हाताळायचा यावरून भाजपचे खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपमध्ये मतभेद समोर आले आहेत. तूर्तास संघर्ष न करता सरकारला सहकार्य करण्याची संभाजीराजेंची भूमिका आम्हाला अमान्य आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात असून या मुद्यावरून भाजपामध्ये संभाजी छत्रपती एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

    मराठा आरक्षणाबाबतची भाजपची भूमिका नेमक्या शब्दात स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षण लगेच मिळावे, मराठा समाजाला सवलती मिळाव्यात यासाठी जो जो व्यक्ती संघर्ष करेल. त्याच्याबरोबर आम्ही आहोत. हे आम्ही दहावेळा सांगितले आहे. संभाजीराजे हे आमचे राजे आहेत. राजेंनी आरक्षण मिळाले पाहिजे, पण संघर्ष न करता मिळाले पाहिजे, असे स्पष्ट केले. हे आम्हाला मान्य नाही असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

    संभाजीराजेंच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. पण त्यांची कृती सरकारला सहकार्य करण्याची असेल आणि कोविडमुळे शांत बसण्याची त्यांची भूमिका असेल तर आम्हाला ती मान्य नाही. त्यांची कृती सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण घेण्याची असेल तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत आहोत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

    दरम्यान, कोविडचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही. जनजीवन व्यवस्थित सुरू आहे. भ्रष्टाचार सुरू आहे. तरीही मराठा समाजाने रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत थांबायचे का? असा सवाल पाटील यांनी केला. 4 जून रोजी मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. पुनर्विचार याचिका दाखल केली नाही तर कोर्टाकडे तारीख मागावी लागेल. पुनर्विचार याचिका उशिरा दाखल केल्याबद्दल न्यायालय सरकारला जाबही विचारेल. त्यामुळे याचिका दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली.