देशव्यापी ‘भारत बंद’ला पाठिंबा देत भव्य मोर्चा

    जयसिंगपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी सुमारे 20 लाख शेतकरी व मजूर आजअखेर 10 महिने दीर्घ आंदोलन करीत आहेत. या शेतकरी व कामगार विरोधी कायद्यामुळे हे सर्व घटक उध्वस्त होणार असून, त्याचे प्रतिकूल परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्था व जनतेवर होत आहेत.

    प्रदीर्घ चाललेल्या या आंदोलनामध्ये सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. कृषी व कामगार विरोधी कायद्याबाबत सरकार निष्क्रिय आहे. त्यामुळे जयसिंगपूर येथे गाव चावडी कार्यालयासमोरून सर्व संघटना एकत्रित येऊन गांधी चौक मार्ग ते क्रांती चौक असा भव्य मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौकात आल्यानंतर निदर्शने करीत प्रचंड मोठ्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

    यावेळी डॉ. महावीर अक्कोळे, प्रा. शांताराम कांबळे, राष्ट्रीय काँग्रेसचे सुभाष भोजणे, सदाशिव पोपळकर, बाबासाहेब नदाफ, कॉम्रेड रघुनाथ देशिंगे, प्रा. डॉ. गजानन चव्हाण व प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी सरकारच्या निष्क्रियपणावर चौफेर टीका करीत सरकारने कृषी व कामगार विरोधी कायदे मागे घेऊन कामगार व तमाम शेतकरी वर्गाला न्याय द्यावी अशी मागणी केली.

    यावेळी लाल बावटा कामगार युनियन, राष्ट्रसेवा दल, शिरोळ तालुका पुरोगामी संघटना, समाजवादी प्रबोधिनी जयसिंगपूर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शेतकरी संघटना,शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटना (सुटा), गोकुळ कामगार संघटना, महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी अमरसिंह निकम, बंडा मिनियार, प्रा. प्रकाश मेटकर, डॉ. अतिक पटेल, डॉ. तुषार घाटगे, प्रा. ए. एस. पाटील, अशोक शिरगुप्पे, डॉ. महादेव सुर्यवंशी, डॉ. सुर्यवंशी, डॉ. नितीश सावंत, प्रा. कांकरंबे, संदीप लाटकर, मारुती जाधव, प्रदीप साळुंखे, शाहीर शब्‍बीर पटेल, खंडेराव हेरवाडे, कॉम्रेड फुलाबाई बेडगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.