शिरोळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषधांचे वाटप

    जयसिंगपूर : गेल्या महिन्यात शिरोळ तालुक्याला महापुराचा मोठा तडाखा बसला होता. महापूर ओसरल्यानंतर तालुक्यातील पूर बाधित गावांमध्ये साथीच्या आजारांनी तोंड वर काढले होते. त्यावेळी उपाय म्हणून सामाजिक बांधिलकी जपलेल्या राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून फिरत्या मोबाईल रुग्णवाहिकेमधून आरोग्यसेवा गावोगावी जाऊन दिली होती, तद्नंतर औषधांचा तुटवडा भासू नये या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून नागरिकांना मोफत औषधोपचार मिळावेत या हेतूने राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच आरोग्य उपकेंद्राना औषधांचा पुरवठा करण्यात आला.

    यामध्ये लहान मुलांसाठी सर्दी, खोकला, ताप तसेच इतर आजारांवरील औषधे पुरविण्यात आली.शिरोळ तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाखरे, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर, औषध निर्माण अधिकारी हाक्के यांच्यासह आरोग्य विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.