कोल्हापुरातील ‘हा’ तलाव फुटला; महिलेसह चार म्हशी गेल्या वाहून

महिला व पती, मुलगा, नातू आपल्या गोठ्यात असणाऱ्या जनावरांना सोडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी काही जनावरे सोडली पण पाणी अचानक वाढल्याने अंधारातून पाण्याबरोबर सर्वजण वाहून गेले. परंतु पती व मुलगा नातू एका झाडाला धरून बसले व कसेबसे बाहेर पडले.

    कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मेघोलीचा (Megholi Lake) लघु पाटबंधारे तलाव बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फुटला. या तलाव्यातील पाणी परिसरात शिरल्याने एक महिला, चार म्हैशी आणि एक बैल वाहून गेला. यंदा जोरदार पाऊस झाल्याने हा तलाव शंभर टक्के भरला होता. मात्र, तलावास काही अंशी गळती सुरू झाली होती. तलावाची गळती काढली नसल्याने सतत पाणी झिरपत राहिल्याने अनर्थ घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तलावाच्या मुख्य गेटलाच भगदाड पडले आणि परिसरात सर्वत्र पाणी पसरले. हा प्रकार रात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली. पण झालेली ही घटना दुर्दैवी असून, या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणारी ठरली आहे.

    भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे तलाव फुटला, अशी बातमी रात्री अकराच्या दरम्यान समजल्याने परिसरातील आणि नदीकाठावरील गावचे अनेक लोक भयभीत झाले. पाणी किती, कोठे आहे? याची विचारणा होऊ लागली. मेघोली धरण फुटल्याचे समजताच परिसरात एकच गोंधळ उडाला.

    पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की यामध्ये ओढ्याच्या दोन्ही बाजूची सर्व पिके वाहून गेली. यात मेघोली, नवले, सोनूर्ली ममदापुर, वेंगरूळ गावचे मोठं नुकसान झाले आहे. ओढ्याकाठची जमिन-पिके वाहून गेली. वेंगरुळ, शेणगावात पाणी शिरले. यामध्ये एक महिला, चार म्हैशी, एक बैल वाहून गेला. तर शेतीची मोठी हानी झाली. घटनास्थळी तहसीलदार अश्विनी अडसूळ यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी व राजकीय नेते घटनास्थळी दाखल झाले.

    या धरण फुटीच्या पाण्याच्या प्रवाहात नवले येथील धनाजी मोहिते यांच्या पत्नी जिजाबाई मोहिते (वय ५५) वाहून गेली. नंतर तिचा मृतदेह ग्रामस्थांनी शोधून काढला. या दरम्यान महिला व पती, मुलगा, नातू आपल्या गोठ्यात असणाऱ्या जनावरांना सोडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी काही जनावरे सोडली पण पाणी अचानक वाढल्याने अंधारातून पाण्याबरोबर सर्वजण वाहून गेले. परंतु पती व मुलगा नातू एका झाडाला धरून बसले व कसेबसे बाहेर पडले. परंतु, आई वाहून गेल्याचे या मुलांच्या लक्षात आले. सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. ग्रामस्थही मदतीला धावले त्यांचा मृतदेह झाडाला अडकलेल्या अवस्थेत सापडला.

    नवले येथील निवृत्ती शिवा मोहिते यांच्या घरात ओढ्याचा प्रवाह घुसल्याने मोठे नुकसान झाले. मोहिते आपल्या कुटुंबासह कसेबसे बाहेर पडले. मात्र, त्यांची एक बैल, तीन म्हशी अशी चार जनावरे गोठ्यातच मृत्युमुखी पडली. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे घरे कोसळली. काही मोटरसायकलीही वाहून गेल्या.