सरकारमधील समन्वयकाची जबाबदारी आता संभाजीराजेंवर असणार : सतेज पाटील

    कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजेंनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची हाक दिली. आम्ही बोललोय, समाज बोललाय, आता तुम्ही बोला, असं आवाहन त्यांनी लोकप्रतिनिधींना केलं होतं. यानुसार आज जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी भरपावसात आंदोलनात सहभागी होत या पाठिंबा दर्शवला. तसेच आपली भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारचे प्रतिनिधी या नात्याने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी महत्वाची भूमिका मांडली.

    संभाजीराजेंनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचं आवाहन करत यासाठी आपण पुढाकार घेऊ, असं आश्वासन त्यांनी दिले. त्याचबरोबर भविष्यात केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयकाची जबाबदारी आता संभाजीराजेंवर असणार आहे, असेही सतेज पाटील यांनी म्हटले आहे. राज्य सरकार संभाजीराजेंनी मांडलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक असून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दिलीप वळसे-पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण उद्याच मुंबईला यावं अशी विनंती सतेज पाटील यांनी संभाजीराजेंना केली आहे.

    कायदेशीर बाबींमध्ये ज्याकाही त्रुटी असतील, त्याची पूर्तता करणं गरजेचं असून, त्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. दिलीप भोसलेंचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण पंतप्रधानांना भेटले आणि चर्चाही केली. त्यामुळे भविष्यात केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयकाची जबाबदारी आता संभाजीराजेंवर असणार आहे, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात संयमाने आंदोलन करण्याच्या भूमिकेबद्दल त्यांनी संभाजीराजेंचे आभार मानले.

    या आंदोलनात श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खा. संभाजीराजे छत्रपती, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, आ. जयंत आसगांवकर, आ. राजूबाबा आवळे, आ. प्रकाश आबिटकर, आ. विनय कोरे, आ. राजेश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्यासह मराठा समाज प्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.