‘जे पेरले तेच उगवले’ खासदार उदयनराजे यांची अजितदादांवर टीका

आयकर विभागाची कारवाई योग्य पद्धतीने सुरू आहे. जो चुकीचे करेल त्याच्यावर कारवाई होत असते. पवारांनी पूर्वी जे पेरलं तेच आता उगवत आहे

  कोल्हापूर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाकडून सुरू असलेल्या छापेमारीचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी समर्थन केले आहे. जे पेरलं तेच उगवलं, अशा शब्दात उदयनराजे यांनी पवारांना टोला लगावला.

  करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी उदयनराजे  कोल्हापुरात आले होते. दर्शनानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पवारांचे नातेवाईक यांच्या सुरू असलेली आयकर विभागाची छापेमारी, मराठा आरक्षण, जनगणना आणि सोमवारचा महाराष्ट्र बंद आदी विषयांवर त्यांनी आपली मते परखडपणे मांडली. पवारांच्या नातेवाईकांवर सुरू असलेल्या आयकर विभागाच्या छापेमारीविषयी विचारणा केली असता उदयनराजे म्हणाले, आयकर विभागाची कारवाई योग्य पद्धतीने सुरू आहे. जो चुकीचे करेल त्याच्यावर कारवाई होत असते. पवारांनी पूर्वी जे पेरलं तेच आता उगवत आहे, अशा शब्दात त्यांनी आयकरच्या कारवाईचे समर्थन केले.

  मराठा आरक्षणाची मशाल चुकीच्या व्यक्तींच्या हाती

  मराठा आरक्षणाविषयी उदयनराजे यांनी रोखठोक मत मांडले. ते म्हणाले, ज्याच्याकडे आत्मियता आहे, तळमळ आहे, अशा व्यक्तींच्या हातात मराठा आरक्षणाची मशाल असणे आवश्यक आहे. मात्र सध्या ही मशाल चुकीच्या व्यक्तींच्या हातात आहे. या उत्तरात त्यांचा रोख मराठा आरक्षणविषयक समितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आहे की अन्य कुणाकडे याची चर्चा नंतर रंगली.

  इतरांना आरक्षण देताना जीआर काढता मग …..

  इतरांना एक जीआर काढून आरक्षण देता, त्यावेळी लोकसंख्या व इतर निकष पाहत नाही. मात्र मराठा समाजला आरक्षण देतानाच का अडचणी येतात, असा सवाल करत उदयनराजे यांनी राज्य सरकारावर टीकास्त्र सोडले.

  जनगणना करा, त्यात राजकारण नको

  २०११ मध्ये जनगणना झाली. आता जनगणना करण्यास अडचण काय?, त्यात राजकारण आणू नका, तातडीने जनगणना करावी. लोकसंख्येच्या आधारे आरक्षण द्यावे, अशी मागणी करून उदयनराजे म्हणाले, जग बदलत आहे. भविष्यात केवळ गुणवत्ता हाच निकष असणार आहे. आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षण देण्यात यावे.

  महाराष्ट्र बंद पेक्षाच्या शेतकरी हिताची चर्चा करा

  उत्तर प्रदेशात जे चुकीचे घडले त्यावर कारवाई व्हायला हवी. यामध्ये शेतकऱयांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सोमवारचा महाराष्ट्र बंद यशस्वी का अयशस्वी यावर चर्चा करण्यापेक्षा राज्य आणि केंद्रातील सरकारांनी शेतकऱयांना आवश्यक ती मदत करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत उदयनराजे यांनी मांडले.

  अंबाबाईला साकडे
  मराठा समाजाला आरक्षण मिळावे, शेतकऱयांना मदत मिळावी, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना बुद्धी दे असे साकडे आपण आई अंबाबाईला घातले असल्याचेही उदयनराजे यांनी सांगितले.