नेबापूर येथे शॉक लागून महावितरणच्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

नेबापूर ता.पन्हाळा येथे विद्युत पुरवठा खंडीत होण्यापूर्वीच खांबावर चढलेल्या कंत्राटी कर्मच्याऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला

  वारणानगर : नेबापूर ता.पन्हाळा येथे विद्युत पुरवठा खंडीत होण्यापूर्वीच खांबावर चढलेल्या कंत्राटी कर्मच्याऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला असून, ही घटना शुक्रवारी (दि. 27) सकाळी ९.४५ वा. सुमारास घडली. बबलू रमेश पावरा (वय २५ वर्ष रा. चिरखनपाडा ता. शिरपूर जि. धुळे. सध्या रा. गोल्डन हॉटेल, वाघबीळ) असे त्याचे नाव आहे.

  महावितरण विद्युत कंपनीच्या पन्हाळा उपविभागात अतिवृष्टीमुळे व खचलेल्या रस्त्यामुळे अनेक विद्युत प्रवाहीत तारा तुटल्याने व विद्युत खांब पडल्याने अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडीत आहे. खंडीत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम पुण्यातील ठेकेदार उद्वव बनसोडे यांना देण्यात आले होते. ठेकेदार १२ कर्मच्याऱ्यासह हे काम करण्यासाठी वाघबीळ येथील हॉटेल गोल्डन येथे मुक्कामास आहे. शुक्रवारी सकाळी कंत्राटी कर्मचारी नेबापूर येथे कामास सुरवात केली.

  वीर काशीद समाधी स्थळाजवळ ज्योतिबा फीडरवर ११ के.व्ही. विद्युत लाईनवर विद्युत खांबावर विद्युत तारा ओढण्यात येणार होत्या. त्याच्यासाठी मुख्य डीपीवरील विद्युत पुरवठा खंडीत (बंद) करण्यास लाईनमन गेले होते. तो वीज पुरवठा खंडीत होण्यापूर्वीच कंत्राटी कर्मचारी बबलू पावरा हा खांबावर चढला असता त्याला त्यावेळी जोराचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पन्हाळा उपविभागाचे सहा.अभियंता अमोल राजे यानी सांगितले.  या प्रकाराने तिथे एकच खळबळ उडाली.

  शॉक लागून मृत्यू झालेल्या बबलू पावरा यास तातडीने कोडोली ता. पन्हाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारास आणले असता डॉक्टरानी तो मृत असल्याचे घोषित केले. तिथेच त्याची उत्तरीय तपासणी करण्यात आली, कोडोली पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मित मयत म्हणून नोंद झाली असून, भूषण पावरा रा.सूड जि. धुळे याने याबाबत वर्दी दिली. पोलीस नाईक संकपाळ यांच्या प्राथमिक तपासानतंर ही घटना पन्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तपासाला पाठवण्यात आली आहे.

  भोंगळ कारभाराला जबाबदार कोण ?

  अलिकडील काळात महावितरण कंपनीची दुरुस्तीची कामे कंत्राटी पद्धतीने केली जातात. त्यामुळे या कामाकडे विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी लक्षच देत नाहीत त्यामुळे अनेक कंत्राटी कर्मच्याऱ्यांचा मृत्यू यापूर्वी झाला आहे. आज नेबापूर येथे घडलेल्या घटनेने बेजबाबदार पणाचा कळस गाठला आहे. त्यामुळे एका तरूणाला जीव गमवावा लागला आहे. पूर्णता वीज पुरवठा खंडीत झाला आहे किंवा नाही याची खात्री करून सूचना ठेकेदाराला देणे गरजेचे होते.

  ठेकेदाराने देखील वीज पुरवठा खंडीत झाल्याची खात्री करूनच कर्मच्याऱ्याला खांबावर चढवले असते तर आज बबलू पावरा याचा जीव वाचला असता. आज दिवसभर सर्व संबंधित अधिकारी-कर्मचारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत माहिती देखील उपलब्ध होत नसली तरी या घटनेला जबाबदार कोण याची निश्चिती करून कंत्राटी कर्मचारी यांना न्याय मिळण्याची गरज आहे.