महावितरणची आर्थिक कोंडी; कोल्हापूर जिल्ह्यात वीजबिलांची थकबाकी ८३४ कोटींवर

कोल्हापूर : जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व वर्गवारीतील वीजबिलांच्या थकबाकीमध्ये गेल्या मार्च ते सप्टेंबरपर्यंत तब्बल ३३२ कोटी ९४ लाख रुपयांनी वाढ झाली असून सद्यस्थितीत ७ लाख ३४ हजार घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषिपंपांसह इतर ग्राहकांकडे ८३४ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी आहे. जिल्ह्यातील या अभूतपूर्व थकबाकीमुळे महावितरणची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. ग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करावा अन्यथा हे आर्थिक संकट आणखीनच गडद होत जाणार आहे.

वीजबिलांचा भरणा न झाल्यास स्थिती आणखी गंभीर होणार

कोल्हापूर : जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व वर्गवारीतील वीजबिलांच्या थकबाकीमध्ये गेल्या मार्च ते सप्टेंबरपर्यंत तब्बल ३३२ कोटी ९४ लाख रुपयांनी वाढ झाली असून सद्यस्थितीत ७ लाख ३४ हजार घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषिपंपांसह इतर ग्राहकांकडे ८३४ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी आहे. जिल्ह्यातील या अभूतपूर्व थकबाकीमुळे महावितरणची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. ग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करावा अन्यथा हे आर्थिक संकट आणखीनच गडद होत जाणार आहे.

कोरोनाच्या संकटापूर्वी मार्चपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात सर्व वर्गवारीतील २ लाख ३८ हजार वीजग्राहकांकडे ५०१ कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी होती. मात्र गेल्या मार्चपासून कोरोना विषाणूचे संकट सुरु झाल्यानंतर लॉकडाऊनच्या काळात व त्यानंतर वीजबिलांचा भरणा कमी होत गेल्याने महावितरणच्या आर्थिक संकटाला सुरवात झाली आहे. मार्चपासून सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात थकबाकीदार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या संख्येत ४ लाख ८७ हजारांनी वाढ झाली असून थकबाकीची रक्कम देखील तब्बल २२४ कोटी ३८ लाखांनी वाढली आहे. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात ५ लाख ८६ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे २५७ कोटी ७८ लाख तसेच कृषिपंप व इतर १ लाख ४८ हजार ७०० ग्राहकांकडे ५७६ कोटी ४८ लाख रुपयांची अशा एकूण ७ लाख ३४ हजार ग्राहकांकडे ८३४ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी आहे.

वीजग्राहकांना ‘अनलॉक’नंतर मीटर रिडींगप्रमाणे वीजबिल देण्यात येत आहे. यापूर्वी ‘लॉकडाऊन’मधील वीजबिलांबाबत निर्माण झालेला संभ्रम महावितरणकडून दूर करण्यात आला आहे. वीजक्षेत्रातील तज्ञांनी सुद्धा महावितरणने रिडींगप्रमाणे तीन ते चार महिन्यांचे एकत्रित दिलेले वीजबिल अचूक असल्याचा निर्वाळा दिला आहे. महावितरणच्या सर्व विभाग कार्यालय अंतर्गत बिलांबाबत हजारो तक्रारी प्राप्त झाल्या. सर्व ग्राहकांचे बिलांबाबत शंकानिरसन करण्यात आले आहे. ग्राहकांनी देखील वीजबिल रिडींगप्रमाणे अचूक असल्याचे मान्य केले असले तरी वीजबिल भरण्याचे प्रमाण वाढलेले नाही. त्यामुळे थकबाकीमध्ये मोठी वाढ होत असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती सध्या चिंताजनक आहे.

वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमिवर विजेची मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी सध्या वीजग्राहकांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. दरमहा वसुलीच्या सुमारे ८० ते ८५ टक्के रकमेतून वीजखरेदी केली जाते. ‘अनलॉक’मुळे वाणिज्यिक वापर, रब्बी हंगाम व सणासुदीचे दिवस, औद्योगिक उत्पादन आदींमुळे या महिन्यापासून प्रामुख्याने औद्योगिक, वाणिज्यिक व कृषिपंपांच्या वीजमागणी मोठी वाढ होत जाणार आहे. दुसरीकडे थकबाकी वाढतच असल्याने वीजखरेदीसाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न महावितरणसमोर उभा ठाकणार आहे.