महाविकास आघाडीबाबत चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले…

    कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी केली आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 400 हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. राज्यातील जनता पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला परत पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, राज्यातील आघाडी सरकार स्थिर राहणार आहे, असेही म्हणाले.

    चंद्रकांत पाटील म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 400 हून अधिक जागा जिंकणार असा वारंवार रिपोर्ट येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर तीन, सहा महिन्यांनी आढावा घेत आहेत भाजपाच्या कामाबद्दल जनता समाधानी आहे. लोकांना माहिती आहे मोदींनी माझ्या घरात गॅस कनेक्शन दिले आहे. विरोधक पेट्रोल-डिझेल संदर्भात आंदोलन करत आहेत, ते स्वत:च्या सरकारलाही विचारत नाहीत. 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडी सरकारला घरी पाठवणार हे निश्चित आहे.

    राज्य सरकारमध्ये एकाने बोलायचं आणि दुसऱ्याने म्हणायचं की असं आम्हाला म्हणायचं नव्हतं. हा खेळ न कळण्याएवढी महाराष्ट्राची जनता मूर्ख नाही. जनतेने मतदान केलेलं नसतानाही सरकार बनवलं. याची शिक्षा निवडणुकीत यांना मिळेल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

    दरम्यान, वर्षानुवर्षे सत्तेत राहिल्यामुळे सत्तेची ताकद त्यांना माहित आहे. त्यामुळे ते एकमेकांसोबत भांडतील खूप पण सरकार पाडतील असं मला वाटत नाही, असे पाटील यांनी शेवटी सांगितले.