डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेधार्थ राष्ट्रीय निषेध दिन; काळ्या फिती लावून कामकाज

    कोल्हापूर/दीपक घाटगे : डॉक्टर्स, सहकर्मचारी आणि हॉस्पिटलवरील हल्ले थांबवा या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनकडून राष्ट्रीय निषेध दिन पाळण्यात आला. भारतात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व शाखांमध्ये हा निषेध दिन पाळण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय संघटना यामध्ये सहभागी झाल्या हाेत्या. संपूर्ण कामकाज काळ्या फिती लावून आणि काळे पोशाख परिधान करून करण्यात आले.

    आंदाेलनाला हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा),होमिओपॅथी असोसिएशन(निहा), आयुर्वेद व्यासपीठ संघटना आणि जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जीपीए) यांनी पाठिंबा दिला. याबाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना चे निवेदन देण्यात आले. छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश शर्मा,वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली.

    प्रत्येक रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी फक्त आपल्याच रुग्णाकडे लक्ष द्यावे, असे रुग्णांच्या नातेवाईक यांना वाटत असते. परंतु डॉक्टरांचे एकावेळी अनेक रुग्णांवर उपचार चालू असतात. हे लोकांनी समजून घेतले पाहिजे.

    – डॉ. गीता पिल्लई, उपाध्यक्षा, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन

    ४५ हजार आयएमएचे सदस्य

    डॉ. उद्धव पाटील, डॉ. अशोक जाधव यांनी मनाेगत व्यक्त केले. मेडिकलचे विद्यार्थीही सहभागी झाले हाेते. महाराष्ट्रातील एकूण ४५ हजार आयएमएचे सदस्य यात सहभागी झाले. यावेळी केएमएच्या उपाध्यक्षा डॉ. गीता पिल्लई, सचिव, खजनिस डॉ. ए. बी. पाटील, सल्लागार समिती सदस्य डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. संजय घोटणे, डॉ. शीतल पाटील, डॉ. उषा निंबाळकर, डॉ. महादेव जोगदंडे, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. अरुण धुमाळे, डॉ. अश्विनी पाटील यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

    रुग्ण आणि डॉक्टर हे नाते निकोप असले पाहिजे. यात कुठल्याही दृष्टी प्रवृत्तींनी प्रवेश करता कामा नये. नाही तर समाजाचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. डॉक्टरांवरील हल्ले हे थांबलेच पाहिजेत, यासाठी कडक निषेध पाळण्यात आला आहे. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेस तसेच सर्व मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जे उद्याचे डॉक्टर आहेत, त्यांना याबाबत जागृत करणे आवश्यक आहे.

    – डॉ. आशा जाधव, अध्यक्षा, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन