मराठा आरक्षणासाठी नवा लढा कोल्हापूरात सोमवारी संभाजीराजेंच्या उपस्थितीत महत्वाची बैठक

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अभ्यास असलेले अनेकजण आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन मी २७ तारखेला भूमिका मांडेन. मात्र एकदा पाय पुढे टाकला की मागे घेणार नाही. त्यावेळी मराठा आमदार आणि खासदारांनी माझे-तुझे केले तर बघा, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता. 

    कोल्हापूर :  मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर पुन्हा नव्या लढ्याची तयारी करण्यासाठी कोल्हापूर येथे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत सोमवारी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कायदेतज्ञ आणि तालीम संस्थांचे प्रतिनिधी हजर असतील. शिवाजी पेठेतील शिवाजी मंडळाच्या सभागृहात सोमवारी सकाळी साडेदहा वाजता या बैठकीला सुरुवात होईल.

    राज्याच्या दौऱ्यावर निघणार

    या बैठकीत संभाजीराजे समाजाची भूमिका जाणून घेणार आहेत. बैठकीनंतर संभाजीराजे समाधीस्थळावर नतमस्तक होऊन करणार राज्याच्या दौऱ्यावर निघणार असल्याचे समजते. संभाजीराजे यांनी यापूर्वीच आपण २७मे रोजी मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता कोल्हापुरात होणा-या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.

    मोदी यांनी भेटीसाठी वेळ दिली नाही

    यापूर्वी मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला खासदार संभीजीराजे छत्रपती स्पष्ट शब्दात ही मोर्चे काढण्याची वेळ नसल्याचे आणि आपण भाजपचा ठेका घेतला नसल्याचे सांगितले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेण्यासाठी चारवेळेला पत्र दिले. मात्र, मोदी यांनी भेटीसाठी वेळ दिली नाही, असे सांगत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे संतापही नुकताच व्यक्त केला होता.

    जबाबदार कोण, शाहुंचा वंशज?

    मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अभ्यास असलेले अनेकजण आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन मी २७ तारखेला भूमिका मांडेन. मात्र एकदा पाय पुढे टाकला की मागे घेणार नाही. त्यावेळी मराठा आमदार आणि खासदारांनी माझे-तुझे केले तर बघा, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता.

    आंदोलन काय असते, हे कोणी मला शिकवू नये. आक्रमक व्हायला दोन मिनिटे लागतात. आता लगेच करु. पण त्यामध्ये सध्या कोरोना काळात जीव महत्वाचा आहे, जगलो तर आंदोलन होईलच कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण, शाहुंचा वंशज? असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला होता.