श्री शाहू सहकारी साखर कारखान्यास मानांकन

    कोल्हापूर : कागल येथील श्री शाहू सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात देशपातळीवरील आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. पर्यावरण, व्यवस्थापन, व्यावसायिक आरोग्यासह सुरक्षा व्यवस्था यासंबंधी कारखान्याने मानांकने मिळवली आणि देशात अव्वल स्थान पटकावले. टीयूव्ही रेहनलँडकडून आयएसओ १४४०१:२०१५ व आयएसओ ४५००१:२०१८ या मानांकनानी शाहू साखर कारखान्याच्या श्रेष्ठतम कामगिरीवर आणखी एकदा शिक्कामोर्तब झाल्याचे कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.
    समरजितसिंह घाटगे म्हणाले, कारखान्याचा चेअरमन म्हणून सांगताना अतिशय अभिमान आणि आनंद होतो आहे की ही मानांकने मिळविणारा श्री छत्रपती शाहू साखर कारखाना हा देशातील सर्वात पहिला साखर कारखाना ठरला आहे. याचे सगळे श्रेय कारखाना स्थापन करण्यापासून आजपर्यंत इतका यशस्वीरीत्या चालवण्यात हातभार लावलेल्या प्रत्येक व्यक्तीला जाते.
    राजे विक्रमसिंह घाटगे यांनी खूप मेहनतीने या कारखान्याची उभारणी केली. सभासद आणि कर्मचाऱ्यांनी कारखाना नावारूपास यावा यासाठी अतोनात कष्ट घेतले. कर्मचारी असो  पदाधिकारी, या सर्वांनी केलेल्या मेहनतीमुळे आजचा हा दिवस पाहायला मिळत आहे. याअगोदरही कारखान्याला अन्य मानांकने मिळाली आहेत. कामामधील गुणवत्तेसाठी आयएसओ ९००१ : २०१५ मानांकन देण्यात आले आहे. गुणवत्तापूर्ण साखर उत्पादनाच्या निर्मितीबरोबरच साखर उत्पादन करण्याच्या ठिकाणी योग्य ती स्वच्छता राखण्याबाबत एफएसएससी : २२००० हे मानांकन आहे.(FSSC 22000) हे मानांकन देण्यात आले आहे.
    ‘विक्रमसिंह घाटगे यांनी घालून दिलेल्या शेतकरी हिताच्या तत्वावर कारखान्याचे कार्य चालू आहे आणि कायमच राहील. या मिळालेल्या मानांकनामुळे कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. इथून पुढेही आपण सर्वजण आकाशाला गवसणी घालण्यासाठी कार्यशील राहू आणि कारखान्याचे नाव आणखी मोठे करू.’असा विश्वास समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला