शेत जमीन संदर्भातील निकाल बाजूने देण्यासाठी तीन लाखांची लाच; एसीबीची कारवाई

    इचलकरंजी : शेत जमीन संदर्भात सुरु असलेल्या वादाचा निकाल बाजूने देतो यासाठी 3 लाख रुपयांची लाच स्वीकारताना भिकाजी नामदेव कुराडे (वय 46 रा. चंदूर) याला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. त्याचबरोबर या प्रकरणी सारंग भिकाजी कुराडे (वय 26 रा. चंदूर) आणि इम्रान मुसा शेख (वय 41 रा. शंभरफुटी रोड सांगली) या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका कोल्ड्रिंक दुकानात करण्यात आली.

    याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदार यांची शिरोळ तालुक्यात शेतजमीन असून या जमिनीच्या मालकीचा वाद सध्या सुरू आहे. सुरुवातीस प्रांताधिकारी कार्यालयात तक्रारदार यांच्या विरोधात निकाल गेला. त्यानंतर तक्रारदाराने अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल दाखल केले असून, सध्या त्यावर सुनावणी सुरू आहे. तक्रारदार यांच्याशी कुराडे याने संपर्क साधत निकाल आपल्या बाजूने लावून देण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी 2 लाख रुपये कुराडे यांनी घेतली होती. तर उर्वरीत 3 लाख रुपयांसाठी सतत मागणी करत होता. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता भिकाजी कुराडे याने लाचेची मागणी केल्याचे आणि त्याला त्याचा मुलगा सारंग कुराडे व इम्रान शेख यांनी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.

    त्यानुसार मंगळवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका कोल्ड्रिंक दुकानात सापळा रचण्यात आला आणि 3 लाखांची रक्कम घेताना कुराडे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणात सारंग कुराडे आणि इम्रान शेख यांचे नांवे निष्पन्न झाली असून, तिघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर पोलिस अधिक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, पोलिस नाईक नवनाथ कदम, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पडवळ, मयूर देसाई, सुरज आपराध यांच्या पथकाने केली.