kolhapur district hospital

न्यू शाहूपुरी मधील दिनमोहम्मद स्वार वय ७८ यांना कोरोना संक्रमण(Corona) झाल्याने त्यांच्यावर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते.

    कोल्हापूर: गेल्या १० दिवसांपासून कोरोना(Corona) आजारावर उपचार सुरू असलेल्या न्यू शाहूपुरी येथील ७८ वर्षीय रुग्णाला आयसीयूमध्ये(ICU) स्थलांतरित करण्यात येत होते.  उपलब्ध बेड शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी अन्य रुग्णाला द्यायला सांगितल्याने दिरंगाई झाल्याने हेळसांड होऊन या वृद्ध रुग्णाला आपला जीव गमवावा लागला.

    त्याचबरोबर जिल्हा सरकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांना दिला जाणारा ऑक्सिजन निकृष्ठ दर्जाचा असल्याचा आरोप करून या प्रकाराची चौकशी व्हावी,अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केल्याने रुग्णालय प्रशासन हडबडून गेले आहे.राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे यांना धारेवर धरल्यानंतर त्यांनी निकृष्ट दर्जाच्या ऑक्सिजन बाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

    याबाबत अधिक माहिती अशी की,येथील न्यू शाहूपुरी मधील दिनमोहम्मद स्वार वय ७८ यांना कोरोना संक्रमण झाल्याने त्यांच्यावर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते.जागा अपुरी असल्याने मनोरुग्ण वॉर्डलाच कोरोना वॉर्डमध्ये रूपांतर करून याठिकाणी रुग्णांवर उपचार केले जात होते.

    दिनमोहम्मद स्वार यांची प्रकृती सुधारली होती.मात्र आज दुपारी अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये रिक्त असलेल्या व्हेंटिलेटर बेड वर स्थलांतरित करण्यात येत होते.त्यांना दुधगंगा इमारतीच्या दारात आणले गेले आणि त्याचवेळी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मोरे यांनी या रिक्त बेडवर अन्य रुग्ण स्थलांतर करण्यास सांगितले म्हणून पुन्हा स्वार यांना पूर्वीच्या वॉर्ड मध्ये नेण्यात येत होते.दरम्यान यावेळी त्यांना लावण्यात आलेल्या ऑक्सिजनचा मास्क दोन तीन वेळा निघाला.मात्र कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.अखेर या वृद्ध रुग्णाने आपला जीव सोडला असा आरोपनातेवाईकांनी केला.

    वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मोरे यांच्या आडमुठ्यापणामुळे त्यांनी या वृद्धासाठी राखीव करून ठेवलेला बेड दुसऱ्याला दिल्यानेच आमचा रुग्ण दगावला याला जबाबदार सर्वस्वी अधिष्ठाता डॉ.मोरेच असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केल्याने रुग्णालय प्रशासन हडबडून गेले.प्रकरण अंगलट येणार असे दिसल्याने डॉ.मोरे यांनी नातेवाईक आरोप करत असलेल्या ऑक्सिजनचा निकृष्ट दर्जाकडे लक्ष विचलित करून या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश दिले.अखेर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने बागल चौक कब्रस्थान मध्ये दफनविधी पार पडला. दरम्यान नातेवाईकांनी याबाबत पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितले.