सानुग्रह अनुदानाच्या निर्णयाने शिरोळकर सुखावले

  • Sanugrah grant

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा व दुधगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील 42 गावांना महापुराची झळ बसली होती. ज्याच्या घरात दोन दिवस पाणी आहे, अशांना सानुग्रह अनुदान मिळणार होते. परंतु, स्थलांतर झालेल्या नागरिकांना ही अनुदान मिळावे. यासाठी सर्वपक्षीय पूरग्रस्त संघर्ष समितीने यासाठी आंदोलन केले होते. तात्काळ आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यासाठी प्रयत्न केल्याने शासनाने सुधारित आदेश काढून स्थलांतर झालेल्या नागरिकांना ही सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तालुक्यातील पूरग्रस्ताच्या अनुदानाचा प्रश्न मिटणार आहे.

शिरोळ तालुक्यातील 42 गावांना महापुराचा फटका बसला होता. लागोपाठ पाणी वाढत असल्याने नदीकाठावरील गावांना सर्कतेचा इशारा देऊन, तात्काळ पूररेषीतील नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर 42 गावातील नागरिकांनी आपले साहित्य, जनावरे घेऊन स्थलांतर केले होते. शेती, घरे, व्यापारी, व्यवसायाला कोट्यवधींचा फटका बसला. पंचनामे करताना जाचक अटींमुळे अधिकारी व पूरग्रस्तामध्ये तंटे सुरू झाले होते. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी शिरोळ तहसीलदार कार्यालयावर मोठ्या मोर्चा काढला होता.

त्याचबरोबर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांना भेटून स्थलांतर झालेल्या नागरिकाचे म्हणणे मांडले होते. त्यानुसार अखेर फेर आदेश येऊन स्थलांतर झालेल्या नागरिकांनाही सानुग्रह अनुदान देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील कुटुंब संख्या आता वाढणार आहे.

महापूर ओसरल्यापासून ज्याच्या घरात पाणी आहे. अशांबरोबरच स्थलांतर झालेल्या नागरिकांना ही सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी मंत्री वडेट्टीवार यांच्याकडे आग्रही मागणी केली होती. ती मान्य झाल्याने सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तसेच पूरग्रस्ताच्या अजून काही मागण्या आहेत. त्या मिळण्यासाठी चर्चा करून पूरग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

– राजेंद्र पाटील यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री