कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राहुल पाटील तर उपाध्यक्षपदी जयवंत शिंपी 

    कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील तर उपाध्यक्ष म्हणून जयवंत शिंपी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या महिनाभरापासून या पदाच्या निवडीसाठी हालचाली गतिमान झाल्या होत्या. काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील व राष्ट्रवादीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमच्याच पक्षाचा अध्यक्ष होणार असा दावा केला होता. मात्र, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे आमदार पी. एन . पाटील यांनी मुलगा राहूल पाटील यांच्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यासाठी त्यांनी वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणी  केली.

    रविवारी रात्रीपासून दोन्ही मंत्री व आमदार पाटील यांच्या चर्चेच्या फेऱ्या रंगल्या. सोमवारी सकाळी पुन्हा एकदा चर्चा होऊन अखेर अध्यक्षपदी राहुल पाटील यांना करण्यास दोन्ही मंत्र्यांनी संमती दर्शवली. तर राष्ट्रवादीकडून उपाध्यक्ष पदासाठी जयवंत शिंपी यांचे नाव देण्यात आले. या पदाच्या निवडणूकीसाठी भाजपाने माघार घेतल्याने या दोघांना संधी मिळाली आहे.

    कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आगामी काळात अनेक निवडणुका होणार आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासाठी विधान परिषदेचे निवडणूक महत्त्वाची आहे. तर हसन मुश्रीफ यांच्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवडणूकीला महत्व आहे. या दोन्हीसाठी आमदार पाटील यांची मदत महत्त्वाची ठरणार आहे. माजी आमदार पी. एन.पाटील यांनी गोकुळच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांना मदत केली होती. आता ते जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांच्या सोबत राहणार असल्याने त्यांना महादेवराव महाडिक यांची साथ सोडवी लागणार आहे.

    आगामी काळत बाजार समिती, शेतकरी संघ, कोल्हापूर महापालिका यासारख्या महत्त्वाच्या निवडणुकांतही ही त्रिमूर्ती एकत्र राहण्याची शक्यता आहे. त्याला शिवसेनेचे सोबत मिळणार असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात महाविकास आघाडीची मुळे आणखी घट्ट रोवली जाणार आहेत.