पूरग्रस्तांसाठी सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय गप्प बसणार नाही : राजू शेट्टी

    जयसिंगपूर : राज्य सरकारकला साखर कारखान्याची कर्जे माफ करण्यासाठी पैसे आहेत. मात्र, पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी हात धजावत नाही. गांधारीची भूमिका घेणाऱ्या राज्य सरकारबरोबर जिल्ह्यातील मंत्र्यांनीही पूरग्रस्त शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. कोणाचे सरकार आहे याच्याशी घेणे-देणे नसून पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी या सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा गर्भित इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. पूरग्रस्तांना न्याय द्यावा यासाठी शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनस्थळी ते बोलत होते.

    शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समिती गेले पाच दिवस वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहे. पाचव्या दिवशी सरकारच्या नावाने गोंधळ पथकाने अंबाबाईचा गोंधळ घालत सरकारला पूरग्रस्तांच्या मागण्या मान्य करण्यासाठी जाग येऊ दे अशी प्रार्थना करण्यात आली. दरम्यान, आंदोलनस्थळी खासदार शेट्टी यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.

    यावेळी समितीचे अध्यक्ष रामचंद्र डांगे, सुरेश सासणे, चांद कुरणे, आप्पासाहेब बंडगर, सिताराम भोसले यांनी सरकारने पुरग्रस्तांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा सोमवारपासून बेमुदत अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे सांगितले.

    शिरोळ तालुक्यातील 43 गावांना महापूराचा प्रंचड फटका बसला असताना सरकारने अद्याप एक फुटकी कवडीही दिली नाही. तात्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे रामचंद्र डांगे, दगडू माने, चांद कुरणे यांनी सांगितले. यावेळी आंदोलनस्थळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे सईद पिरजादे, माऊली महिला संस्थेच्या भाग्यश्री अडसूळ, सतीश चौगुले, राहुल सूर्यवंशी उपस्थित होते.