पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, राजू शेट्टी यांची पंचगंगा परिक्रमा यात्रा सुरू

    कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची पंचगंगा परिक्रमा यात्रा सुरू झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून या यात्रेला करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथे सुरुवात झाली. पूरग्रस्त शेतकऱ्यांना 2019 च्या महापुराचीच्या धर्तीवर नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांचे कर्ज पीक माफ करावे यासह विविध मागण्या या आंदोलनाच्या दरम्यान करण्यात येणार आहेत.

    पूरग्रस्त शेतकऱ्यांना तोकडी मदत जाहीर करणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात राजू शेट्टी यांनी रणशिंग फुंकले असून आज प्रयाग चिखली येथून या यात्रेला सुरुवात झाली. तब्बल पाच दिवस ही यात्रा पायी चालत जाऊन नृसिंहवाडी येथे जलसमाधी आंदोलन करत याची सांगता होणार आहे.

    दरम्यान, राजू शेट्टी यांनी 23 ऑगस्टला पूर निवारणाच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले होते. या मोर्चात त्यांनी पंचगंगा परिक्रमेचा इशारा दिला होता. पण सरकारने आंदोलनाकडे लक्ष दिले नाही. म्हणूनच त्यांनी आजपासून पंचगंगा परिक्रमा सुरू केली आहे. आज सकाळी प्रयाग चिखलीपासून या पंचगंगा परिक्रमेला सुरुवात झाली. प्रयाग संगम येथील दत्त मंदिरात आल्यावर त्यांनी अभिषेक केला व मग यात्रेला सुरुवात केली.

    काय आहेत मागण्या?

    पुरामुळे सांगली आणि कोल्हापूरचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे संपूर्ण शेत उध्वस्त झाले. लोकांची घरे पाण्याखाली गेली. अनेक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मात्र, आजपर्यंत पूरग्रस्तांना सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. या सर्वांना सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. 2019 च्या जीआर नुसार पूर मदत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.