पन्हाळगडावर भरपावसात रास्ता रोको

    वारणानगर : पन्हाळगडावरील छोटे व्यवसायधारक व गाईड लोकांचा व्यवसाय कोरोना महामारीमुळे पुरता कोलमडला आहे. गाईड व छोटे व्यावसायिक यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा. या मागणीसाठी राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या वतीने पन्हाळा येथील चार दरवाजा येथे भरपावसातच अध्यक्ष राजीव सोरटे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक प्रशासन लक्ष देत नसल्याने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांना देण्यात आले.
    सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लाँकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटनस्थळे देखील बंद ठेवण्यात आली आहेत. पन्हाळा देखील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने येथील 60-70 टक्के लोकांचा व्यवसाय पर्यटनावरच आधारित आहे. पण गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे पन्हाळगडावरील पर्यटन व्यवसाय संकटात सापडला आहे. कोरोनामुळे पन्हाळा पर्यटनासाठी बंद ठेवण्यात येईल याची शाश्वती नाही. तसेच लॉकडाऊन असूनही वीजबील, पाणीबील, कर्जाचे हफ्ते यांना खंड पडलेला नाही. तर व्यवसायच बंद असल्याने दैनंदिन गरजा कशा पूर्ण कराव्यात हा कठीण प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे येथील पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या छोटे व्यावसायिक व गाईड लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असून, हा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
    यावेळी तालुकाध्यक्ष अर्जुन कासे, शितल गवंडी, माजी नगरसेवक रविंद्र धडेल, शशिकांत बच्चे, कुलदीप बच्चे यांच्यासह व्यावसायिक, गाईड व पन्हाळ्यातील नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते. दरम्यान, आजच्या रास्ता रोको आंदोलनामुळे पन्हाळा- बुधवारपेठ मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत केली.