कोल्हापुरात पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट जारी; ‘या’ गावांना सतर्कतेचा इशारा

    कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. वेधशाळेने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, राधानगरी, शाहुवाडी, पन्हाळा, गगनबावडा, भूदरगड या तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

    नदी पात्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने बुधवारी पंचगंगेच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून, पाणी पात्राबाहेर पडले आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३१’ फुट ४” इंच इतकी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाचे प्रमाण सतत वाढत असल्यामुळे डोंगराळ भागामध्ये भूसख्खलन, दरडी कोसळणे अथवा जुन्या घरांची पडझड होणे यांसारख्या घटना घडत आहे. त्यामुळे जिल्हयातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.