वारणा समूहाच्या वतीने निलेवाडी गावचे पुनर्वसन

  वारणानगर : वारणा नदीच्या महापुराने १९५३ पासून पुरग्रस्त असलेल्या हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी गावचे शंभर टक्के पुनर्वसन वारणा समूह करणार असून यासाठी लागणारी वारणा समूहाची निलेवाडीजवळच असलेली आंबीलटेक येथील १८ एकर जमीन पुनर्वसनासाठी देण्याची घोषणा निलेवाडीतील जाहीर समारंभात वारणा समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी करून माता बहिनींना ही रक्षाबंधनची भेट दिल्याचे सांगितले.

  कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या वारणा नदीच्या महापुराने पन्हाळा व हातकंणगले तालुक्याच्या सिमेवर असलेले निलेवाडीचे १९५३ च्या महापूरानतंर सन २००५ व २०१९ च्या व या वर्षीच्या महापूरात निलेवाडी जलमय झाल्याने स्थलांतरीत करण्यात आले होते. पूरात जलमय झालेल्या निलेवाडीचे शेतीचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी शासनाकडे पूरग्रस्त म्हणून मिळणारी मदत नको. पण पुनर्वसन करा यासाठी आंदोलने देखील केली आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी वारणानदीमध्ये जल समाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता.

  निलेवाडी हे गाव वारणा समूहाच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने गावातील शिष्ट मंडळ आमदार विनय कोरे यांना भेटलं आणि गावच पुनर्वसन करण्यासाठी शासन दरबारी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार आमदार कोरे यांनी आंबील टेकावर असलेली वारणा समूहाची जमीन, निलेवाडी गावच्या पुनर्वसनासाठी देण्याच कबूल केलं आणि ही भेट निलेवाडी गावच्या माता भगिनींना आजच्या रक्षाबंधनची ओवाळणीत भेट देत असल्याचं सांगितलं.

  वारणा नदीच्या महापुरामध्ये अनेक गाव जलमय झाली. त्यामध्ये निलेवाडी लाही झळ बसते, पूर येतो. गावातील नागरिक स्थलांतरित होतात लोकप्रतिनिधी आणि शासनाचे प्रतिनिधी येतात आणि पुनर्वसन करण्याचे आश्वासन देऊन जातात पण या गावचं पुनर्वसन अद्यापही झालेले नाही. म्हणून या गावच्या पुनर्वसनासाठी वारणा उद्योग समूहाच्या वतीने आंबील टेक या ठिकाणी असलेली १८ एकर जागा निलेवाडी गावच्या पुनर्वसनासाठी देणार असल्याचं विनय कोरे यांनी आज जाहीर केले.

  पूरग्रस्त निलेवाडी गावचा दौरा करत असताना गावांमधील एका सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी याबाबतची घोषणा करून वारणा समूहाकडून तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाकडून ही बहिण भेट असल्याचं आमदार कोरे यांनी सांगितलं.

  या समारंभात जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यानी बोलताना या गावचा पुनर्वसन करताना शासनाने घातलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात अशी मागणी केली.

  यावेळी प्रदीप देशमुख, रवींद्र जाधव बाबासो माने आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आ. विनय कोरे यांच्या पुनर्वसनाच्या घोषणेने निलेवाडीत आनंदाचे वातावरण पसरले असून, सुमारे ४५० कुटुंबाचे पुनर्वसन होणार आहे.