पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ; पुराची शक्यता

    कोल्हापूर : जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन नदीचे पाणी पात्राच्या बाहेर पडले आहे. अद्याप पावसाचा जोर असल्यामुळे मोठा पूर येण्याची शक्यता आहे. बुधवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने गुरूवारी दिवसभरात झपाट्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे नदीचे पाणी पात्राच्या बाहेर पडले. हा पाऊस पेरणीला पूरक असल्यामुळे उघडताच पेरणीच्या कामाची लगबग उडणार आहे.
    कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर माजगाव नजीक असणारा पूल पाण्याच्या दाबाने मध्यरात्री वाहून गेला आहे. या पाण्याच्या दाबाने ओढ्याच्या काठावरील शेती पम्प वाहून जाऊन शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. कोल्हापूर गारगोटी रोडवरील चंद्रे-शेळेवाडी ओढ्यावरील पुलाचे काम गेली अडीच वर्षे संथ गतीने सुरू आहे. या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने जितेंद्रसिंग प्रायव्हेट लिमिटेड या संबंधित ठेकेदार कंपनीने ओढ्यावर पर्यायी मार्ग तयार केला होता.
    पर्यायी मार्ग तयार करताना या ओढ्याच्या पाण्याच्या प्रमाणात विसर्गाचे नियोजन न केल्यामुळे गुरुवारी मध्यरात्री पाण्याचा तुंब वाढून पाण्याच्या दाबाने पर्यायी मार्ग वाहून गेला. अद्यापही पावसाचा जोर कायम आहे.