परमबीर सिंग भाजपाचे डार्लिंग; हसन मुश्रीफ यांची घणाघाती टीका

परमरबीर सिंह यांना माफीचा साक्षीदार बनवण्यात येणार होते. ते आणि सचिन वाझे हे जवळचे मित्र आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत? परमबीर सिंह यांची एनआयएने साधी चौकशीदेखील केली नाही, असा आरोप करत मुश्रीफ यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांवर टीका केली.

    कोल्हापूर : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे भाजपचे डार्लिंग आहेत, अशी घणाघाती टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी परमबीर सिंह आणि भाजपावर केली आहे. परमरबीर सिंह यांना माफीचा साक्षीदार बनवण्यात येणार होते. ते आणि सचिन वाझे हे जवळचे मित्र आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत? परमबीर सिंह यांची एनआयएने साधी चौकशीदेखील केली नाही, असा आरोप करत मुश्रीफ यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांवर टीका केली.

    भाजपाने दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा…

    भाजपाच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीनकुमार जिंदल यांनी शरद पवार यांच्या आजारपणावर टीका करताना प्रकृतीचा निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाशी संबंध जोडला होता. जिंदल यांची ही टीका दुर्दैवी आहे. भाजपाने दोन दिवसात याबाबत दिलगिरी व्यक्त केली नाही तर फार मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला. उल्लेखनीय आहे की, शरद पवार यांची पोटदुखी बरी झाली असो वा नसो, लक्षात ठेवा सत्य बाहेर आल्यावाचून राहणार नाही, असा इशारा जिंदल यांनी दिला होता. यावरून मुश्रीफांनी भाजपावर टीकेची तोफ डागली आणि वारंवार याबाबत टिपणी टाळण्याचा सल्ला दिला.

    पवारांना चालण्यास आणि जड अन्नपदार्थ खाण्यास परवानगी

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असून ते उपचाराना उत्तम प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती पक्षप्रवक्ते नबाब मलिक यांनी दिली. मलिक म्हणाले की, डॉ. अमित मायदेव यांनी गुरुवारी सायंकाळी सात वाजता शरद पवार यांची तपासणी केली. आता त्यांना चालण्यास आणि जड अन्नपदार्थ खाण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय त्यांची तब्येतही चांगली असल्याचे नवाब मलिक यांनी ट्विट करत सांगितले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाल्यापासून पवार रुग्णालयात दाखल आहेत.