सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपचा आटापिटा : सतेज पाटील

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबतीत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईडीकडे तक्रार केली आहे. ती यंत्रणा पुढील कार्यवाही करत आहे.

    कोल्हापूर : केंद्रात नारायण राणे मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील तीनपैकी एकही पक्ष आपल्यासोबत येणार नाही, याची खात्री भाजपला झाली. त्यामुळे राज्यात सत्ता असताना पाच वर्षे शांत असणारे भाजपचे नेते आता सरकार अस्थिर करण्यासाठी आटापिटा करत आहेत, असा आरोप कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी पत्रकार बैठकीत केला.

    कोल्हापुरात पत्रकार बैठकीत बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, एखाद्या प्रकरणाची विशिष्ट यंत्रणेकडे तक्रार दिल्यानंतर ती यंत्रणा त्याचा पुढील तपास करत असते.  तक्रारदाराने फिरायची गरज नसते. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबतीत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईडीकडे तक्रार केली आहे. ती यंत्रणा पुढील कार्यवाही करत आहे. अशावेळी सोमय्या कोल्हापुरात येऊन काय करणार आहेत? असा सवाल करून ते म्हणाले, ते येथे येऊन काय माहिती घेणार आहेत. तपास यंत्रणा माहिती घेईल.

    जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची काय गरज आहे. गणेश विसर्जनात सर्व पोलिस यंत्रणा व्यस्त आहे. अशावेळी त्यांना बंदोबस्त देणे अशक्य होते. त्यामुळेच त्यांना जिल्हाबंदी करण्याचा आदेश प्रशासनाला काढावा लागला. राज्यात भाजपची सत्ता असताना गुन्हे बाहेर काढले नाहीत. आताच कशासाठी हा आटापिटा सुरू आहे. पाच वर्षे गुन्हा लपवणे हादेखील गुन्हाच आहे.

    – सतेज पाटील, गृहराज्यमंत्री