राजाराम कारखान्यातर्फे शेतकऱ्यांना क्रेडिटवर बियाणे

    कोल्हापूर : अतिवृष्टी आणि महापुरामुळे नदीकाठच्या संपूर्ण पिकांचे अपरिमित नुकसान  झाल्याने सभासद, शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हातभार लावण्यासाठी राजाराम कारखान्याच्या वतीने क्रेडिटवर बियाणांचा पुरवठा करणार असल्याची घोषणा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केली.

    शेतकऱ्यांचे जीवनमान ऊस पिकावर अवलंबून आहे. परंतु यंदा संपूर्ण ऊस पिक बाधित झाल्यामुळे शेतकऱ्यांना काढून टाकण्याशिवाय अन्य पर्याय उरलेला नाही. नदीकाठच्या सभासद शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी राजाराम कारखान्याने मदतीचा हात पुढे केला आहे. शेतातील बाधित ऊस पिक काढून त्याच क्षेत्रात ऊसाची पुर्नलागण करण्यासाठी सभासद शेतकऱ्यांना कमाल १ एकर मर्यादित क्षेत्राकरीता क्रेडिटवर को – ८६०३२, ९२००५, १०००१, ९०५७, ८००५, ३१०२ या जातीचे ऊस बियाणे अथवा ऊस रोपे क्रेडिटवर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

    कोरोना प्रतिबंधक उपाययोजना

    मागील वर्षातील कोरोना परिस्थिती व पुरस्थिती याचा विचार करुन संचालक मंडळाने सर्वच सभासदांना प्रति शेअर्स पाच किलो सवलतीच्या दरातील साखर देण्याचा निर्णय देखील घेतला असून कारखान्यामार्फत सुरु असलेल्या विविध ऊस विकास योजनांची माहिती पत्रकाव्दारे देण्याचे काम शेती विभागामार्फत सुरु आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना माहितीसह मास्क किटचे वाटप सर्व सभासदांना केले जात आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, व्हाईस चेअरमन वसंत बेनाडे, अमल महाडिक, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस उपस्थित होते.